कर्नल पुरोहित, साध्वी मोक्कातून मुक्त

कर्नल पुरोहित, साध्वी मोक्कातून मुक्त

मुंबई - दहा वर्षांपूर्वी मालेगावमध्ये झालेल्या बॉंबस्फोटाच्या खटल्यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंहसह लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह आठ जणांवरील मोक्का आज विशेष न्यायालयाने हटविला. मात्र, बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत दहशतवादविरोधी कारवाया केल्याच्या आरोपांसह हत्या, कटकारस्थान आदी गंभीर आरोपांवर सर्व जणांवर फौजदारी खटला चालविण्याचे आदेश दिले.

बॉंबस्फोटाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास पथकाच्या विशेष न्यायालयात आज मालेगाव बॉंबस्फोटाच्या खटल्याबाबत सुनावणी झाली. विशेष न्या. एस. डी. टेकाळे यांनी आज खटल्यातील अकरा आरोपींच्या आरोपपत्राबाबत निर्णय जाहीर केला. पुरोहित आणि साध्वीवरील मोक्का कायद्यानुसार केलेले आरोप न्यायालयाने हटविले आहेत. त्यामुळे आरोपींना काहीसा दिलासा मिळाला आहे. मोक्कावरील आरोप हटविण्यासाठी सर्व आरोपींनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका केल्या होत्या. त्यामुळे आजच्या निर्णयामुळे त्यांच्यावर मोक्कानुसार खटला चालणार नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार ठेवण्यात आलेल्या आरोपांवर खटला चालविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यातील कलम 16 (दहशतवादी कारवाया करणे), 18 (कारस्थान करणे), यासह भादंवि कलम 120 ब (कटकारस्थान), 302 (हत्या), 307 (हत्येचा प्रयत्न करणे) आणि 326 (जाणीवपूर्वक इतरांना इजा पोचविणे) या आरोपांवर पुरोहित, प्रज्ञासिंह यांच्यासह अन्य आरोपींविरोधात खटला चालविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम 17 (दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ पुरविणे), 20 (दहशतवादी कृत्य करणाऱ्या संघटनेशी संबंधित असणे आणि 23 (दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या साथीदारांना साहाय्य करणे) हे तीन आरोप सर्व आरोपींविरोधात वगळण्यात आले आहेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सामाजिक शांतता भंग करणे, मालमत्तेची हानी पोचविणे आदी आरोपांवरही आरोपींविरोधात खटला चालविण्यात येणार आहे. दहशतवादी कारवायांच्या आरोपांतर्गत जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद कायद्यामध्ये आहे.

प्रज्ञासिंह आणि पुरोहितसह आरोपी सुधाकर द्विवेदी, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चर्तुवेदी आणि अजय राहिरकर यांचा समावेश आहे. याशिवाय अन्य दोन आरोपी जगदीश म्हात्रे आणि राकेश धावडे यांच्यावर केवळ शस्त्रास्त्र कायद्यानुसार खटला चालविण्यात येणार आहे. 15 जानेवारी रोजी न्यायालय आरोप निश्‍चित करणार आहे. यावेळेस सर्व आरोपींनी हजर राहावे, असे आदेशही न्यायालयाने दिले. आरोपी शाम साहू, शिवनारायण कलसंग्रा आणि प्रवीण टकाल्की या आरोपींना न्यायलयाने पुरेशा पुराव्याअभावी दोषमुक्त जाहीर केले.

न्यायालय म्हणते..
आरोपी क्रमांक एक असलेल्या साध्वी प्रज्ञासिंहची मोटारबाईक या बॉंबस्फोटामध्ये वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे. तसेच तिची बाईक बॉंबस्फोटामध्ये वापरल्याची पुरेशी सविस्तर माहितीही तिला होती. त्यामुळे तिचा या बॉंबस्फोटामध्ये सहभाग नव्हता, हा "एनआयए'चा दावा मान्य करणे कठीण आहे. शिवाय बॉंबस्फोट झाल्यानंतर तिने मनुष्यहानी कमी झाल्याबाबत केलेली विधानेही आक्षेपार्ह आहेत. त्यामुळे या बॉंबस्फोटाशी माझे घेणे-देणे नाही, हा साध्वी प्रज्ञाने केलेला दावाही मान्य होणे कठीण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com