पर्यटनस्थळांवर मिळणार दर्जेदार निवास सुविधा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 जून 2017

एअर बीएनबी व पर्यटन विभागात सामंजस्य करार

एअर बीएनबी व पर्यटन विभागात सामंजस्य करार
मुंबई - आदरातिथ्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील एअर बीएनबी ही कंपनी आणि राज्य सरकारचा पर्यटन विभाग यांच्यामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. एअर बीएनबी ही पर्यटकांना वाजवी दरात निवास व्यवस्था आणि स्थानिक अनुभव मिळवून देणाऱ्या सेवा-सुविधा पुरविणारी कंपनी असून तिचे जगभरातील देशांमध्ये जाळे विस्तारले आहे. आज झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून या देशातील पर्यटकांना महाराष्ट्रात येण्यासाठी एक खात्रीचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सामंजस्य करारानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले, की पर्यटनाचा व्यवसाय हा आता बहुतांश ऑनलाईन झाला आहे. बरेच पर्यटक पर्यटनाला जाण्यापूर्वी सर्व सोयी-सुविधांची ऑनलाईन बुकिंग करतात. या पार्श्वभूमीवर एअर बीएनबीसमवेत झालेला सामंजस्य करार महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रात ऐतिहासिक पर्यटनस्थळे, सांस्कृतिक वैविध्य मोठ्या प्रमाणात आहे. या पर्यटनस्थळांवर आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय मानके असलेली निवासव्यवस्था उपलब्ध होण्यास आजच्या सामंजस्य करारामुळे चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमानंतर गरवारे क्‍लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या सामंजस्य कराराबाबत पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, की एअर बीएनबी ही कंपनी पर्यटकांना निवासाचा आगळावेगळा अनुभव उपलब्ध करून देते. स्थानिकांशी समन्वय साधून पर्यटकांना निवासाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना स्थानिक संस्कृती, खाद्यपदार्थ, कला-संस्कृती आदींचे दर्शन घडविते. महाराष्ट्रातील घरगुती निवास व्यवस्थांना एअर बीएनबीच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठ मिळणार आहे. या भागीदारीच्या माध्यमातून राज्यभरात आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्रात किमान 50 हजार लघुउद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट आहे, असेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

रावल म्हणाले की, राज्यातील दुर्लक्षित असलेल्या पर्यटनस्थळांवर साधन-सुविधांची निर्मिती करून पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. अशा पर्यटनस्थळांवर निवास व्यवस्थांच्या उपलब्धतेसाठी एअर बीएनबी आणि पर्यटन विभाग एकत्रित काम करेल. अमरावती येथे विकसित होत असलेला डिअर पार्क, चिपळूण येथील क्रोकोडाईल पार्क, भंडारदरा, चिखलदरा, सिंधुदुर्ग, सह्याद्रीच्या रांगा, दुर्लक्षित किल्ले, समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे अशा विविध ठिकाणी स्थानिकांसमवेत भागीदारी करून निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळण्याबरोबरच पर्यटकांनाही दर्जेदार आणि खात्रीची निवासव्यवस्था मिळू शकेल, असेही श्री. रावल म्हणाले.

Web Title: mumbai maharashtra news Quality accommodation facility on tourism place