राहुल यांना अटक म्हणजे शेतकऱ्यांची मुस्कटदाबी - राधाकृष्ण विखे 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 जून 2017

मुंबई - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मध्य प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पडसाद आज मुंबईत उमटले. प्रदेश कॉंग्रेसने या अटकेचा निषेध केला, तर घाटकोपर येथे युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोकल रोखण्याचा प्रयत्न केला. भाजप सरकारच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांना अटक करणे म्हणजे शेतकऱ्यांची मुस्कटदाबी असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. कॉंग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे भाजप सरकारच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सहभागी झाले होते. घाटकोपर येथे युवक कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी अचानक लोकल रोखण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची धावपळ उडाली. पण रेल्वे पोलिसांनी तातडीने या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने याचा फारसा परिणाम वाहतुकीवर होऊ शकला नाही.

भाजपचे केंद्र सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने देण्यात आली होती. परंतु, आपलीच आश्वासने पाळण्यास हे सरकार साफ नकार देत आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे देशभरातील शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असून, वारंवार दाद मागितल्यानंतरही कर्जमाफी व हमीभावाबाबत ठोस निर्णय घेण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याने बळिराजासमोर रस्त्यावर उतरल्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही, अशी भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली.

Web Title: mumbai maharashtra news radhkrishna vikhe patil talking about rahul gandhi