नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा उडीद खरेदी करणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मुंबई - सरकारकडे नोंदणी करूनही खरेदी न झालेल्या उडदाची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सरकारच्या हमीभाव केंद्रावर 32 हजार 240 शेतकऱ्यांची नोंदणी केलेली होती; मात्र केंद्र सरकारने खरेदीचा दिलेला लक्ष्यांक पूर्ण झाल्यामुळे या शेतकऱ्यांचा उडीद खरेदी झालेला नव्हता. केंद्र सरकारने हमीभावाने खरेदी करण्याची तारीख वाढवून दिली होती; मात्र लक्ष्यांक पूर्ण झालेला असल्यामुळे 32 हजार शेतकऱ्यांच्या उडदाची खरेदीच झालेली नाही.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या उडीद खरेदीच्या संदर्भात उडीद खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 लाख क्विंटल उडीद हमीभावाने खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारला मागितलेली आहे. केंद्र सरकारची परवानगी येण्याची वाट न पाहता राज्य सरकारकडूनच खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जरी केंद्र सरकारने वाढीव खरेदीला परवानगी दिली नाही, तरी राज्य सरकार शेतकऱ्यांना हमीभावाने पैसे देणार आहे.

राज्य शासनाने हमीभावाने उडदाची खरेदी केली आहे. 5400 रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने ही खरेदी झाली. राज्यातील एकूण 23 जिल्ह्यांतील 118 केंद्रांवर 5 लाख 20 हजार 288 क्विंटल उडदाची खरेदी झाली होती. यामध्ये एकूण 17 हजार 741 शेतकऱ्यांचा उडीद हमीभावाने खरेदी करण्यात आला. मात्र हमीभावाने खरेदी करत असताना 32 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करूनदेखील त्यांचा उडीद खरेदी होऊ शकला नाही. खरेदीच्या आगोदर हमीभाव खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी नावनोंदणी करावी असे आवाहन केले होते. खरेदी केंद्रांवर अधिकृत नोंदणी केलेल्या आणखी 32 हजार 240 शेतकऱ्यांची नोंदणी झालेली होती; मात्र त्यांचा उडीद खरेदी झाला नव्हता. या निर्णयामुळे या शेतकऱ्यांच्या उडदाची खरेदी होणार आहे. उडदाबरोबरच नोंदणी झालेल्या सोयाबीन आणि मुगाचीदेखील खरेदी केली जाणार असल्याची माहिती विभागाकडून मिळाली आहे.

केंद्र सरकारने तारीख वाढवून दिली आहे; मात्र लक्ष्यांक वाढवून दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा उडीद खरेदी होऊ शकला नव्हता. त्यामुळे सरकारने स्वतःच्या पातळीवरच उडीद खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. 32 हजार शेतकऱ्यांचा उडीद शिल्लक राहिलेला आहे. या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे.
- सदाभाऊ खोत, राज्यमंत्री, कृषी व पणन

Web Title: mumbai maharashtra news The registered farmers will buy udid