विरोधकांच्या "संविधान रॅली'च्या विरोधात भाजपची "तिरंगा रॅली'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 जानेवारी 2018

मुंबई - केंद्र आणि राज्यातील सरकारची विकासकामे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विरोधकांकडून भाजप आणि सरकारला बदनाम करण्याचा कट आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विरोधकांकडून संविधान बचाव रॅली काढण्यात येत आहे. मात्र विरोधकांच्या रॅलीला प्रत्युत्तरादाखल प्रत्येक जिल्ह्यात "तिरंगा रॅली' काढण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली.

दादर येथील वसंत स्मृती केंद्रात भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक झाली. या वेळी राज्यातील सामाजिक, राजकीय आणि सरकारकडून करण्यात येत असलेल्या कामांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दानवे यांनी वरील घोषणा केली.

दानवे म्हणाले, 'यापूर्वी सरकारच्या विरोधात विरोधकांनी काढलेला हल्लाबोल मोर्चा अपयशी ठरला. त्याचा कोणताही परिणाम राज्यातील जनतेवर झालेला नाही. आता पुन्हा काढण्यात येणाऱ्या "हल्लाबोल'चा कोणताही परिणाम होणार नाही. कोरेगाव भीमा येथील प्रकरणानंतर काही जणांकडून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. मात्र, सौहार्दचे वातावरण राखण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.''

"कोरेगाव भीमा' हे मोठे षड्‌यंत्र - मुख्यमंत्री
"कोरेगाव भीमा'प्रकरणी मोठ्या प्रमाणावर षड्‌यंत्र झालेले आहे. भाजप व सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठीच अशा गोष्टी करण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत केला. मात्र, सरकारने या प्रकरणात आपली जबाबदारी नीट पार पाडल्याचा दावा त्यांनी केला. लोकांशी जास्तीत जास्त संपर्क ठेवून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

Web Title: mumbai maharashtra news republic day political agitation tiranga rally