सबका साथ, सबका विकास हा नारा घेऊनच कार्यरत - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 जुलै 2017

मुंबई - जैन समाजाने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, सामाजिक कार्यातही ते पुढे आहेत. जैन धर्माचे विचार त्या समाजातील अनेक व्यक्तींनी सर्व समाजापर्यंत पोचविण्याचे काम केले आहे. या पद्धतीनेच पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली "सबका साथ, सबका विकास' हाच नारा घेऊन आम्ही काम करत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

जैन समाजबांधवांच्या वतीने आयोजित जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन (जिओ) "मेगा बिजनेस जिओ कॉन्फरन्स'मध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, अभिनेते जॅकी श्रॉफ, आमदार ऍड. आशिष शेलार, नया पद्मसागर महाराज आदींसह देशभरातील विविध ठिकाणी कार्यरत असलेले जैन बांधव उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, 'जेव्हा पुण्य एकत्र येते तिथे सर्व जण नतमस्तक होतात. अशाप्रकारे नया पद्मसागर महाराज यांचे जैन समाजासाठीचे कार्य खूप मोठे असल्याने त्यांच्यापुढे सर्व जण नतमस्तक होतात. या समाजाने व्यापारी जगतात आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे देशाच्या विकासातील त्यांचे योगदान ठळकपणे जाणवते. जैन समाजाने 17 हजार गावांत केलेले जलसाक्षरतेचे काम उल्लेखनीय आहे. गुजरात सरकारप्रमाणे आम्हीही गोरक्षण महत्त्वाचे मानतो. ज्या ठिकाणी गोरक्षा केली जात नाही तो प्रदेश, तेथील जमिनीची सुपीकता कमी होत असल्याचे आढळले आहे. आपली घटनादेखील दुधाळ पशूंचे संवर्धन करावे, असे सांगते. गोरक्षण फक्त धार्मिक गोष्टीशी निगडित नाही, आपले अनेक धर्मांतील सिद्धांत विज्ञानाशी जोडले गेले आहेत. नुकताच देशात जीएसटी कायदा लागू झाला असून, एक देश एक कर यामुळे विकासाला चालना मिळेल. जीएसटीच्या माध्यमातून मानव विकास निर्देशांक वाढून रोजगाराच्या संधी निर्माण होतील.''

मेघवाल म्हणाले, 'जीएसटीचा सर्वसामान्यांसह सर्वांनाच फायदा होणार आहे. सर्वसामान्य माणसाचे आयुष्य आनंदी व्हावे, हाच यामागचा हेतू आहे, जीएसटी आपले भविष्य आहे.''

Web Title: mumbai maharashtra news sabka saath sabka vikas slogan