सागरमालामुळे निर्यातीला चालना मिळेल - गडकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 31 मे 2017

मुंबई - सागरमाला प्रकल्पाअंतर्गत मोठी गुंतवणूक अपेक्षित असून, यामुळे भारतीय निर्यातीला मोठी चालना मिळेल, तसेच रोजगाराच्या नवीन संधी तसेच चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होतील, असे केंद्रीय जलवाहतूक, रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. गडकरी यांच्या हस्ते आज जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे 8 कनेक्‍टिव्हीटी प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ झाला. या वेळी ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, "जेएनपीटी'मध्ये सुमारे 1117 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असून, या प्रकल्पामुळे "जेएनपीटी अंतर्गत भागाशी जोडले जाईल. जेएनपीटी सेझ विभागात कारखाने उभारण्यासाठी अनेक कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे, असेही ते म्हणाले. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन बंदर भागातील आणि भोवतालच्या परिसरातील विकासाला चालना देणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर पोर्ट ट्रस्टने लक्ष केंद्रित केले असून, याद्वारे मुक्त व्यापाराला चालना मिळेल, तसेच उद्योग सुलभीकरणातही योगदान वाढेल, असे जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai maharashtra news Sea goods will boost exports