हरवलेल्यांचा शोध संवेदनशीलतेने घ्यावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

मुंबई - पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तींचा तपास संवेदनशीलतेने करावा, नागरिकांचे चारित्र्यहनन होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि तक्रारदारावर संशय घेणे टाळावे, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना केल्या आहेत.

मुंबई - पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तींचा तपास संवेदनशीलतेने करावा, नागरिकांचे चारित्र्यहनन होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि तक्रारदारावर संशय घेणे टाळावे, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना केल्या आहेत.

भाऊ हरवल्याच्या तपासात दोन वर्षांनंतरही काही प्रगती न झाल्याने एका तक्रारदाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिची सुनावणी नुकतीच झाली.

हे प्रकरण न्यायालयाने मागील वर्षी गुन्हे शाखेकडे सोपवले होते. मात्र, तपासातून विशेष काही निष्पन्न झाले नाही. याचिकादाराच्या दाव्यानुसार त्याच्या भावाने कार्यालयातील एका महिला सहकाऱ्याला पन्नासहून अधिक वेळ दूरध्वनी केला होता. मात्र, याबाबत पोलिस तपास करीत नाहीत. तुमचा भाऊ दारू पित होता, तो कौटुंबिक वाद आणि समस्यांना कंटाळून स्वतःहूनच निघून गेल्याची कारणे पोलिस देत आहेत, असे याचिकादाराने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

पोलिसांच्या या वृत्तीमुळे आमचे मानसिक खच्चीकरण होत आहे, असेही न्यायालयात सांगण्यात आले. त्यावर पोलिसांनी या प्रकरणात अशी कारणे देऊ नयेत, असे निर्देश न्यायालयाने दिले. याचिकादार गुजरातमधील असल्यामुळे तेथेही तपास करावा, अशी सूचनाही न्यायालयाने पोलिसांना केली.

सीमाशुल्क एजंट म्हणून काम करणारा याचिकादाराचा भाऊ दोन वर्षांपूर्वी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. मात्र सायंकाळी तो घरी परतला नाही. याबाबत याचिकादाराने पायधुणी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.

Web Title: mumbai maharashtra news The search for lost ones should be taken sensibly