शरद पवार सर्व खेळपट्ट्यांवर खेळणारे अष्टपैलू खेळाडू - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मुंबई - देशातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व शरद पवार हे सर्वच खेळपट्ट्यांवर खेळणारे अष्टपैलू खेळाडू असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत काढले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तव मांडताना ते बोलत होते. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही मुख्यमंत्र्यांनी मांडला.

आधुनिक महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे पवारसाहेब असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यतील विधानसभा, विधान परिषदेचे सदस्य, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य अशा सर्वच सभागृहांत त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. वयाच्या 38 व्या वर्षी मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांना सर्वांत कमी वयाचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. कृषिमंत्री या नात्याने त्यांनी आखलेल्या धोरणानुसार राज्यातील उसाचे क्षेत्र तुषार सिंचनाखाली आणण्याचा आमच्या सरकारने निर्णय घेतला. त्याचबरोबर 40 वर्षांपूर्वी पवारसाहेबांनी नागपूर-मुंबई महामार्गाची संकल्पना मांडली होती, हा रस्ता तेव्हाच झाला असता तर मराठवाडा-विदर्भाचा विकास झाला असता. आता त्यांच्याच संकल्पनेतील समृद्धी महामार्ग आम्ही बांधत आहोत. आमच्या या निर्णयाला आता विरोध करू नये, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव माडताना मुख्यमंत्री म्हणाले, की विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला आहे.

विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून अकराव्यांदा त्यांनी विक्रमी विजय मिळविला आहे. 2009च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्यापाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम 1962 च्या निवडणुकीत विजयी झाले. 1995 चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता. गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि 1999 मध्ये शेकापने कॉंग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. आबासाहेब म्हणजे महाराष्ट्राचे चालते-बोलते विद्यापीठ असल्याचे गौरवोद्‌गार फडणवीस यांनी काढले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai maharashtra news Sharad Pawar all-rounder who plays on all the pitch