सुकाणू समिती आजपासून पुन्हा मैदानात

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई - शेतकरी प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरवात म्हणून सुकाणू समितीच्या वतीने उद्या, 10 जुलैपासून राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरू करण्यात येत आहे. उद्या नाशिक येथे भव्य एल्गार सभा घेऊन या जनजागरण यात्रेची सुरवात करण्यात येणार आहे.

मुंबई - शेतकरी प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरवात म्हणून सुकाणू समितीच्या वतीने उद्या, 10 जुलैपासून राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरू करण्यात येत आहे. उद्या नाशिक येथे भव्य एल्गार सभा घेऊन या जनजागरण यात्रेची सुरवात करण्यात येणार आहे.

सुकाणू समितीमध्ये सामील असलेल्या सर्व प्रमुख संघटना या जनजागरण यात्रेत सामील होत आहेत. सुकाणू समिती संपूर्ण राज्याचा दौरा करीत प्रमुख 14 ठिकाणी सभांना मार्गदर्शन करणार आहे. राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भात केलेल्या फसवणुकीविरोधात यात्रेतून जनजागरण केले जाणार असून, संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी लढ्याची दिशा या जनजागरण यात्रेतून ठरविली जाणार असल्याची माहिती राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली.

शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी त्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळण्याची नितांत गरज आहे. शेतीमालाला भाव मिळावा व शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यात्रेदरम्यान या मागणीसाठी व्यापक प्रचार करण्यात येणार आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी गावोगाव पोचविण्यासाठी पुस्तिका व प्रचार साहित्य तयार करण्यात आले आहे. यात्रेद्वारे हे साहित्य शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. सुकाणू समितीमध्ये सामील झालेल्या सर्व शेतकरी संघटनांनी यात्रेसाठी स्वतंत्र प्रचार रथांचे नियोजन केले आहे. जिल्हा स्थरावर यात्रेच्या निमित्ताने सर्व संघटनांनी एकत्र येत भव्य जाहीर सभांचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांची तरुण पिढी यासाठी अत्यंत उत्स्फूर्त पुढाकार घेत आहे.

जनजागरण यात्रेचा समारोप पुण्यात
नाशिक येथून 10 जुलै रोजी सुरू होणारी जनजागरण यात्रा ठाणे (पालघर), रायगड (रत्नागिरी, सिंधुदुर्ग), नगर, धुळे (नंदुरबार, जळगाव), अमरावती (यवतमाळ), बुलडाणा (अकोला, वाशीम), वर्धा (नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया), नांदेड, परभणी (हिंगोली, औरंगाबाद, जालना), बीड (लातूर), सोलापूर (उस्मानाबाद), कोल्हापूर, सांगली मार्गे जाणार असून, पुणे येथे 23 जुलै रोजी यात्रेचा समारोप होणार आहे.

Web Title: mumbai maharashtra news sukanu committee