'ताजनापूर उपसा सिंचन'बाबत विधान भवनात आढावा बैठक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - नगर जिल्ह्यातील ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या टप्पा-2च्या कामासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनात आढावा बैठक घेतली. या वेळी जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.

मुंबई - नगर जिल्ह्यातील ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या टप्पा-2च्या कामासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनात आढावा बैठक घेतली. या वेळी जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की जायकवाडी जलाशयामुळे पुनर्वसित प्रकल्पबाधितांना सिंचनाचा लाभ देणे गरजेचे आहे. ताजनापूर उपसा सिंचन प्रकल्पाचा पहिला टप्पा 2011 मध्ये पूर्ण झाला असला, तरी दुसऱ्या टप्प्याचे कामही वेगाने पूर्ण होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लागणारा 15 कोटींचा निधी केंद्र शासनाकडून विविध योजनेअंतर्गत प्राप्त करू. त्यासाठी सर्व मागण्यांचे एकत्रित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा-2 हा प्रकल्प नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्‍यात आहे. हा प्रकल्प 395.48 कोटी रुपयांचा असून, पहिला आणि दुसरा टप्पा मिळून 6 हजार 960 हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यावर 3 हजार 878 दशलक्ष घनफूट पाण्याची उपलब्धता असणार आहे. या प्रकल्पात 2 हजार 614 अश्वशक्तीचे विद्युत पंप उभारणीची कामे पूर्ण झाली असून, पोच रस्ता, पोच कालवा, मुख्य पंपगृह, ऊर्ध्वगामी नलिका या घटकांची 95 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. 70 टक्के विद्युत कामे पूर्ण झाली असून, वितरण कुंडाच्या कामासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.

Web Title: mumbai maharashtra news tajnapur lift irrigation vidhan bhavan