कर्जमाफीबद्दल मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 जुलै 2017

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची "वर्षा'वर भेट

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची "वर्षा'वर भेट
मुंबई - केवळ कर्जमाफीवर न थांबता शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना राबवण्याबरोबरच कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील नागरिकांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या निश्‍चितपणे दूर करू, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे 70 शेतकऱ्यांनी गुरुवारी "वर्षा' या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली, या वेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, की अन्य राज्यांनी लावलेले निकष न लावता सरसकट कर्जमाफी देऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याचा फायदा 36 लाख शेतकऱ्यांना होईल. 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा प्रयत्न करत आहोत. याशिवाय दुष्काळाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, अनुदान यांसारख्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीबरोबरच शेतमालाला हमीभाव आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

जालना जिल्ह्यातील केशव मदन या शेतकऱ्याने 20 वर्षांत पहिल्यांदा शेतमालाला योग्य भाव मिळाला आहे, असे या वेळी सांगितले. या ऐतिहासिक निर्णयाचा तरुण शेतकऱ्यांना विशेष फायदा होईल, असे औरंगाबाद येथील कैलास निकम म्हणाले. जिंतूर तालुक्‍यातील वयोवृद्ध शेतकरी अश्रुबा सांगळे यांनी मुख्यमंत्र्यांना खास शेतकऱ्यासारखा पटका बांधला.

या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार सुरजितसिंह ठाकूर, प्रशांत बंब आदी उपस्थित होते.

बैलगाडीची प्रतिकृती आणि भावपूर्ण पत्र
या भेटीच्या वेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना बैलगाडीची प्रतिकृती भेट दिली. मुख्यमंत्र्यांना भावपूर्ण पत्रही दिले. या पत्रात त्यांनी लिहिले आहे, की तुम्ही नुसती कर्जमाफी जाहीर केली नाही, ती योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे, याची काळजी घेतली. आजपर्यंत कर्जमाफी देताना जिल्हावार शेतकऱ्यांची आकडेवारी जाहीर करणारे पहिले मुख्यमंत्री आम्ही पाहिले. 36 लाख 10 हजार 216 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे, असे नेमके सांगण्यासाठी पारदर्शकता लागते. ती तुमच्यात आहे, हे तुम्ही दाखवून दिले. तुमचे असे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय पाहून असे वाटते की, तुमच्या विश्‍वासावर आम्ही शेतीत आणखी धाडसाने नवे प्रयोग करू शकतो. यापुढेही असेच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहाल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: mumbai maharashtra news Thanks to the Chief Minister for the debt relief