भाजप विरुद्ध कॉंग्रेस सामना रंगणार

भाजप विरुद्ध कॉंग्रेस सामना रंगणार

मुंबई - गुजरात निवडणुकीच्या प्रचारात चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी बहुमत नसतानाही कॉंग्रेसने उमेदवार कायम ठेवल्याने 7 डिसेंबरला होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड आणि कॉंग्रेसचे दिलीप माने यांच्यात लढत होणार असल्याचे गुरुवारी (ता. 30) स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी (ता. 7) सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होईल.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. भाजपचे प्रसाद लाड आणि कॉंग्रेसचे दिलीप माने यापैकी कुणीही अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक अटळ आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी न देता भाजपने प्रसाद लाड यांना पोटनिवडणुकीत संधी दिली. लाड यांना शिवसेनेने समर्थन दिले आहे. त्यामुळे त्यांचा विजय नक्की मानला जात आहे. कॉंग्रेसला राष्ट्रवादी कॉंग्रेसने उघड पाठिंबा दिला आहे. त्याच वेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी "कॉंग्रेसला अदृश्‍य हात' मदत करतील, असे सूचक वक्‍तव्य केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फोडाफोडीचे राजकारण रंगण्याचे संकेत मिळत आहेत.

शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपची बाजू भक्कम
विधानसभेत भाजपचे 122, शिवसेनेचे 63, कॉंग्रेसचे 42, राष्ट्रवादी कॉंग्रेस 41, शेतकरी कामगार पक्ष आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी तीन, अपक्ष सात, एमआयएमचे दोन; तर सपा, रासपा, मनसे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप)चे प्रत्येकी एक आमदार असे संख्याबळ आहे. निवडून येण्यासाठी 145 मतांची आवश्‍यकता आहे. भाजप आणि शिवसेनेच्या मतांचा विचार करता प्रसाद लाड सहज विजयी होतील, असे चित्र आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मतांची संख्या युतीपेक्षा खूपच कमी आहे; मात्र गुजरात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवार कायम ठेवण्याचा कॉंग्रेसने निर्णय घेतला आहे.

विधानसभेतील बलाबल
भाजप 122
शिवसेना 63
कॉंग्रेस 42
राष्ट्रवादी कॉंग्रेस 41
शेकाप 3
बहुजन विकास आघाडी 3
एमआयएम 2
अपक्ष 7
सपा 1
मनसे 1
रासपा 1
भाकप 1

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com