मुख्यमंत्र्यांची निवड जनतेतून का नाही? - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

मुंबई - 'सरपंच लोकांमधून निवडला जाणार असेल, तर मग मुख्यमंत्र्यांची निवड लोकांमधून का करू नये, असा प्रश्‍न जनता विचारत आहे,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्य सरकारला फटकारले. भाजप नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा राज्य मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना, "ही मंडळी त्यांना वाटेल तेव्हा एखाद्याचा वाल्या आणि वाटेल तेव्हा वाल्मीकी करतील,' असा टोला ठाकरे यांनी लगावला.

शिवसेना कार्यालयाचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, 'ग्रामसभेत सदस्य आणि सरपंच वेगवेगळ्या पक्षांचे असल्यास गावांच्या विकासात अडचणी येऊ शकतील. मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीची घाई नको. या निर्णयामुळे विकासाचा चोथा होण्यापूर्वीच त्यावर पुनर्विचार करण्यात यावा.''

एकनाथ खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. त्यावर ठाकरे म्हणाले, ""झोटिंग समितीचा अहवाल पारदर्शी असावा. तो सगळ्यांसमोर येऊ द्या.'' भाजपची मंडळी कोणाला कधीही मंत्रिमंडळात घेऊ शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

...तर आक्रमक भूमिका घेऊ
दहीहंडी, गणेशोत्सवासारख्या हिंदूंच्या सणांसाठी नवे कायदे येतात, मग हिंदूंना जीव मुठीत घेऊन सण साजरे करावे लागतात. मशिदींवरील भोंग्यांबाबत कोणी आवाज उठवत नाही. ते वर्षभर सुरू असतात. आमचे उत्सव वर्षातून एकदाच येतात. या मुद्द्यांवर तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी तोडगा निघायला हवा. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत तोडगा न निघाल्यास आक्रमक भूमिका घेऊ, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

Web Title: mumbai maharashtra news Why is not the choice of chief minister from the people?