राजकारणात युवा नेत्यांचे "अच्छे दिन'..!

संजय मिस्कीन
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

मुंबई - राजकारणात घराणेशाहीतल्याच वारसांना संधी मिळण्याची परंपरा देशभरात असली तरी गुजरात निवडणूक निकालाने मात्र सामान्य व कर्तृत्ववान युवा नेत्यांचे "अच्छे दिन' येण्याचे सूतोवाच आहेत. गुजरातमध्ये हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी व अल्पेश ठाकोर या युवा नेत्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता देशभरात युवा नेत्यांना मोठ्या संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

राजकीय घराणेशाहीचा वारसा नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांच्या समोर एकाकी संघठन उभारण्यात हार्दिक, अल्पेश व जिग्नेश यांना यश आले आहे. त्यामुळे, देशभरातील युवा नेत्यांमध्ये आत्मविश्‍वासदेखील वाढल्याचे चित्र आहे.

सोशल मीडियातून राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या या युवा नेत्यांची दखल आता मुख्य माडियादेखील गंभीरपणे घेऊ लागल्याने युवा नेते सुखावले आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून कन्हैया कुमारसारख्या विद्यार्थी नेत्याचा उदय झाला; तर बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रसाद यादव हे तरुण नेतृत्वदेखील चर्चेतला चेहरा बनला आहे.

महाराष्ट्रातही आता युवा नेत्यांना सर्वच पक्षात संधी असल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री पंकजा मुंडे हे युवा नेते आता प्रमुख नेते बनले आहेत; तर कॉंग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्यानंतर देशभरात ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, जतिन प्रसाद हे युवा चेहरे नेते झाले आहेत. महाराष्ट्रात खासदार राजीव सातव हे नेतृत्व आघाडीवर आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व मान्य झाले असून, या पक्षातून आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांसारखे नवे चेहरे समोर येत आहेत. युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम व उपाध्यक्ष सत्यजित तांबे हे युवा चेहरेही आता प्रस्थापित होत आहेत.

युवकांचे महत्त्व वाढले
देशभरात युवा कार्यकर्त्यांना केवळ कार्यकर्ताच न ठेवता क्षमता असलेल्यांना संधी देण्याची गरज असल्याची चर्चा राजकीय नेत्यामधे सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत आता युवकांना अधिकात अधिक संधी द्यावी लागेल, असे स्पष्ट केले आहे, तर राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकांतून मिळालेल्या आत्मविश्‍वासानंतर व पक्षाचे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर कर्तृत्ववान युवा चेहऱ्यांना समोर आणण्याची रणनीती सुरू केल्याचे सांगितले जाते.

Web Title: mumbai maharashtra news youth leader acche din in politics