मुंबई-नागपूर महामार्ग: विधान परिषदेत गदारोळ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 डिसेंबर 2016

या महामार्गासाठी ठाणे, नगर, अमरावती आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये लॅण्ड पुलिंग करण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांना जमिनींच्या बदल्यात आर्थिक मोबदल्यासोबत विकसित भूखंड दिले जाणार आहेत.

नागपूर - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेकडो हेक्टर जमीनप्रकरणातील आर्थिक स्त्रोतांची चौकशी केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले असतानाच याप्रकरणाचे तीव्र पडसाद आज (शनिवार) विधान परिषदेतही उमटले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव, काँग्रेसचे नारायण राणे आणि संजय दत्त यांनी सरकारला घेरले असता विधान परिषदेत प्रचंड गदारोळ उडाला. आणि विरोधकांनी सभात्याग केला. 
मंगळवारी (ता.13) दै.सकाळने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. याप्रकरणी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनीही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. 

त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या महामार्गासाठी ठाणे, नगर, अमरावती आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये लॅण्ड पुलिंग करण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांना जमिनींच्या बदल्यात आर्थिक मोबदल्यासोबत विकसित भूखंड दिले जाणार आहेत. त्यामुळे कोणी जमिनी खरेदी केल्या असतील तर त्यांना त्याचे लाभ मिळणार नाहीत. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांकडून या जमिनींची खरेदी झाली असेल तर कोणत्या पैशातून ही खरेदी झाली याचे स्त्रोत तपासले जातील आणि त्याची चौकशी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. 

Web Title: Mumbai-Nagpur highway land issue