दाऊदच्या मालमत्तांचा ११.५८ कोटींना लिलाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

लिलाव झालेल्या दाऊदच्या मालमत्ता
डांबरवाला बिल्डिंग, पाकमोडिया स्ट्रीट, भेंडी बाजार, मुंबई
किंमत - ३ कोटी ५४ लाख रुपये
हॉटेल रौनक अफरोज (दिल्ली जायका), भेंडी बाजार, मुंबई
किंमत - ४ कोटी ५२ लाख ५३ हजार रुपये
शबनम गेस्ट हाउस, पाकमोडिया स्ट्रीट, भेंडी बाजार, मुंबई
किंमत - ३ कोटी ५२ लाख रुपये

मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या जप्त केलेल्या मुंबईतील तिन्ही मालमत्तांचा मंगळवारी स्मग्लर्स अँड फॉरेन एक्‍स्चेंज मॅनिपुलेटरने (सफेमा) लिलाव केला. सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्टहाउस या मालमत्तांसाठी सर्वाधिक म्हणजेच ११.५८ कोटींची बोली लावली. या लिलावात १२ जण सहभागी झाले होते, अशी माहिती ‘सफेमा’च्या अधिकाऱ्याने दिली.

चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबर (आयएमसी) बिल्डिंगमधील किलाचंद कॉन्फरन्स रूममध्ये ही लिलाव प्रक्रिया झाली. ई-टेंडर, सिल्ड टेंडर (बंद लिफाफे) आणि प्रत्यक्ष बोली अशा तीन स्वरूपात ही बोली लावण्यात आली होती. ई-बोलीमध्ये दिल्लीचे वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी सर्वाधिक बोली लावली होती; मात्र बंद लिफाफे उघडल्यानंतर सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने सर्वाधिक बोली लावल्याचे स्पष्ट झाले. या लिलावाला चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे मूळ किमतीपेक्षा अधिक रकमेला बोली लावण्यात आल्याचे सफेमाचे अधिकारी सेलवम गणेश यांनी सांगितले.

दाऊदच्या रौनक अफ्रोझ हॉटेलसाठी दोन कोटींची बोली लावली होती, पण जेव्हा लिफाफे उघडले त्या वेळी एसयूबीटी संस्थेने सर्वाधिक चार कोटी ५२ लाखांची बोली लावली. मी या बोलीत दुसऱ्या क्रमांकावर गेलो. तरीही मी अद्याप आशा सोडलेली नाही, असे भूपेंद्र भारद्वाज यांनी सांगितले. सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट भेंडी बाजार परिसराचा समूह विकास करत आहे. त्याच परिसरात या तिन्ही मालमत्ता आहेत. त्यामुळे यापूर्वीही या ट्रस्टने दाऊदच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवली होती.

यापूर्वीच्या लिलावात दाऊदची हिरव्या रंगाची मोटार अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी ३२ हजारांत खरेदी केली होती. दहशतवादाचे प्रतीक म्हणून त्यांनी गाझियाबादमध्ये मोटार जाळली. या वेळीही त्यांनी दाऊदच्या मालमत्ता खरेदी करून तेथे शौचालय बांधणार असल्याचे जाहीर केले; पण त्यात त्यांना यश आले नाही.

पुनर्विकास करणार
दाऊदच्या तिन्ही मालमत्ता जीर्ण झाल्या असून राहण्यासाठी योग्य नाहीत. त्यामुळे या इमारतीतील कुटुंबांच्या सुरक्षेसाठी आणि पुनर्विकास करण्यासाठी आम्ही लिलावात सहभागी झालो, अशी माहिती सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

२०१५ मधील लिलाव अपयशी
दाऊदच्या मालमत्तेचा २०१५ मध्येही लिलाव झाला होता. ज्येष्ठ पत्रकार एस बालाकृष्णन यांनी दाऊदच्या रौनक हॉटेलसाठी चार कोटी २८ लाख रुपयांची बोली लावली होती, पण ३० लाख रुपये जमा केल्यानंतर उर्वरित रक्कम त्यांना देता आली नाही. त्यामुळे या मालमत्तेचाही समावेश या लिलावात करण्यात आला होता.

सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट  
हा ट्रस्ट भेंडीबाजार परिसराचा सामूहिक विकास करत आहे. त्याची स्थापना डॉ. सैय्यदाना आणि डॉ. सैयदना ताहिर सैफुद्दीन यांनी एकत्र येऊन केली. भेंडीबाजार परिसरात व्यापारी आणि उच्चभ्रू वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी परिसरातील विकासाचे काम हाती घेतले आहे. यापूर्वी २०१५ मध्येही लिलावात या ट्रस्टचा सहभाग होता.

Web Title: mumbai news 11.58 crores for Dawood's property