26/11 तील जखमी पोलिसाच्या कन्येस नोकरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई - 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पोलिस कॉन्स्टेबल अरुण जाधव यांची मुलगी धनश्री यांना राज्य सरकारने नोकरी दिली आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेऊन धनश्री यांना नोकरीत सामावून घेतले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मी आभारी आहे, अशा भावना जाधव यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई - 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पोलिस कॉन्स्टेबल अरुण जाधव यांची मुलगी धनश्री यांना राज्य सरकारने नोकरी दिली आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेऊन धनश्री यांना नोकरीत सामावून घेतले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मी आभारी आहे, अशा भावना जाधव यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

धनश्री यांना नोकरीत सामावून घेतल्याचा आदेश मंगळवारी जारी झाला. योगायोगाने याच दिवशी अरुण जाधव यांना 29 वर्षे गुणवत्तेने पोलिस सेवा पूर्ण केल्याबद्दल "राष्ट्रपती पोलिस पदक' मिळाले. हा दुहेरी आनंद असल्याचे जाधव म्हणाले. विशेष म्हणजे दहशतवादी हल्ल्यावेळी दाखविलेल्या शौर्याबद्दल जाधव यांना यापूर्वीच राष्ट्रपतींकडून शौर्य पदक व पराक्रम पदक मिळाले होते. आता त्यांना तिसरे पदक मिळाले आहे. धनश्री जाधव यांनी कृषी अभियांत्रिकी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

त्यामुळे त्यांची कृषी खात्यात उपसंचालक या क्‍लास वन पदावर गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 2 एप्रिल रोजी त्या कामावर रुजू होतील, असे जाधव म्हणाले.

अरुण जाधव यांची कामगिरी
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्यात हेमंत करकरे, अशोक कामटे व विजय साळसकर हे तिघे जण दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी एका पोलिस व्हॅनमधून निघाले होते. त्यांच्यासोबत पोलिस कॉन्स्टेबल अरुण जाधव हेसुद्धा होते. पण दुर्दैवाने दहशतवाद्यांच्या गोळीबारात करकरे, कामटे व साळसकर हे हुतात्मा झाले. अरुण जाधव यांनाही पाच गोळ्या लागल्या होत्या. जाधव मृत झाल्याचे समजून दहशतवाद्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ही गाडी घेऊन दहशतवादी नरिमन पॉइंटच्या दिशेने पळाले. पण मध्येच गाडी बंद पडल्याने दहशतवाद्यांनी ती रस्त्यातच सोडून दिली. दहशतवादी गेल्यानंतर जखमी अवस्थेत जाधव यांनी वायरलेसवर दहशतवाद्यांची माहिती दिली. या आधारेच पोलिसांनी कसाबला जिवंत पकडले. या प्रकरणी नेमलेल्या राम प्रधान समितीनेही जाधव यांचे कौतुक करून शौर्य पदक व पराक्रम पदकासाठी शिफारस केली होती. दहशतवादी हल्ल्यात जाधव यांना 42 टक्के अपंगत्व आले आहे.

Web Title: mumbai news 26/11 terror attack injured police daughter job dhanashri jadhav