देशात 76 टक्के बनावट "एलईडी' बल्ब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

मुंबई - देशातील चार प्रमुख शहरांत एलईडी दिव्यांबाबतची फसवणूक उघड झाली आहे. 76 टक्के एलईडी कंपन्या बनावट एलईडी बल्ब बाजारात विकत आहेत. इलेक्‍ट्रॉनिक, इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजीचे ग्राहक सुरक्षा मानक आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड हे दोन्ही निकष लावल्यावर "एलईडी' बनावट असल्याचे दिसून येते. असे बल्ब तयार करून बाजारात विकण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचा अहवाल संशोधन क्षेत्रातील "निल्सन'ने मांडला आहे.

मुंबई, दिल्ली, अहमदाबाद आणि हैदराबाद या चार शहरांतील सर्वेक्षणानुसार 48 टक्के एलईडी बल्बच्या ब्रॅंडवर पत्ता दिलेला नाही. 31 टक्के कंपन्यांच्या ब्रॅंडवर उत्पादकाचे नाव नाही. भारतीय वैधमापन नियामकाचे उल्लंघनही या कंपन्या करत असल्याचे निरीक्षण निल्सनने नोंदविले आहे. बनावट बल्बची सर्वांत जास्त विक्री दिल्लीत होत आहे. त्यापाठोपाठ हैदराबाद, अहमदाबाद आणि मुंबईत असे बल्ब विकले जातात. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डचा उल्लेख नसणाऱ्या 73 टक्के कंपन्यांचे बल्ब दिल्लीत विकले जातात. मुंबईत हे प्रमाण 36 टक्के आहे. एलईडी बल्ब उत्पादकाचे नाव नसण्याचे प्रमाण दिल्लीत 32 टक्के आढळले आहे. मुंबईत हे प्रमाण 2 टक्के आहे. बल्ब उत्पादकाचा पत्ता नसण्याचे प्रमाण दिल्लीत 34 टक्के आहे. मुंबईत हे प्रमाण 2 टक्के आहे. "निल्सन'ने चार शहरांतील 200 दुकानांत ही पाहणी केली. जुलैमध्ये पाहणी पूर्ण झाल्यावर सोमवारी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

इलेक्‍ट्रिक लॅम्प अँड कंपोनंट मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, भारतात एलईडी बल्बची उलाढाल 10 हजार कोटींच्या आसपास आहे. त्यापैकी एलईडीचा वापर असलेल्या उपकरणांचे मार्केट 50 टक्के आहे. या उत्पादनातही 71 टक्के कंपन्या सुरक्षा मानकांच्या बाबतीत सक्षम ठरलेल्या नाहीत.

Web Title: mumbai news 76% bogus led bulb