देशाच्या आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका काढावी - आनंद शर्मा 

देशाच्या आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका काढावी - आनंद शर्मा 

मुंबई -  "भारताची आर्थिक स्थिती कोलमडलेली आहे. भारतीय जनता पक्षाने तीन वर्षांपूर्वी जी आश्वासने दिली होती, त्यापैकी किती आश्वासने पूर्ण झाली. हे भाजपने लोकांना सांगायला हवे. त्याचबरोबर देशाच्या आर्थिक परिस्थितीवर सरकारने श्‍वेतपत्रिका काढावी', अशी मागणी कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. 

शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. बेरोजगारी वाढली आहे. देशातील आंतरिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. सीमेवर जवान रोज शहीद होत आहेत. पाकिस्तानमधून वारंवार हल्ले होत आहेत, अशा परिस्थितीत मोदी सरकार कसला उत्सव साजरा करत आहेत. हे सरकार असंवेदनशील असून फक्त जाहिरातबाजी करत आहे. लोकांचा पैसा जाहिरातीवर उधळत, असल्याचा आरोप शर्मा यांनी केला. 

भाजप सरकारने तीन वर्षात किती व कोणाकोणाला रोजगार दिला याचा संपूर्ण तपशील नाव, पत्ता, नंबरसहित जाहीर करावा. तसेच नोटबंदीमुळे अडीच कोटी लोकांचा रोजगार व व्यवसाय गेला आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे सरकारने गेल्या दहा वर्षातील जीडीपीची आकडेवारी जनतेसमोर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, खासदार रजनी पाटील, प्रवक्ते सचिन सावंत, राजू वाघमारे आणि माजी आमदार चरणसिंग सप्रा उपस्थित होते. 

विशेष अधिवेशन बोलवावे 
शेतकरी संप संपलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सदाभाऊ खोत यांनी संप तोडण्याचा प्रयत्न केला. पण ते अयशस्वी ठरले आहेत. शेतकरी छोटा किंवा मोठा नसतो. सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे. शेतकरी संपाला आमचा पाठिंबा असून सरकारने फेरविचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. त्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com