महामंडळांच्या नियुक्‍त्या शिवसेनेसाठी रखडल्या

संजय मिस्कीन
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई - भाजप-शिवसेना कार्यकर्ते चातकासारखी वाट पाहात असलेल्या महामंडळांवरील नियुक्‍त्यांचा मुहूर्त लवकरच जाहीर होण्याचे संकेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपकडे येणाऱ्या महामंडळांवरील नियुक्‍त्यांना हिरवा कंदिल दिला असला तरी शिवसेनेने मुंबईतील आर्थिकदृष्ट्या सक्षम महामंडळांवर दावा सांगितल्याने अंतिम निर्णय लांबणीवर पडला आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या दोन्ही पक्षांच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजप-शिवसेना सत्तेत आल्यापासून राज्यातील विविध महामंडळांवरील नियुक्‍त्या रखडल्या आहेत. आता निवडणुकीला केवळ दीड ते पावणेदोन वर्षांचा कालावधी उरला असतानाही सरकार महामंडळांवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.

त्यातच शिवसेना व भाजपमध्ये महामंडळांचे वाटप कसे असावे यावरून टोकाचा संघर्ष सुरू होता. याबाबत दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये अनेक वेळा बैठका झाल्या. मुंबईतील महत्त्वाच्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महामंडळांवर शिवसेनेने दावा केला. यामध्ये म्हाडा, इमारत दुरुस्ती व देखभाल यांचा समावेश आहे. याशिवाय इतर आर्थिक व सामाजिक महामंडळांचे वाटप करतानाही दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ होती.

अखेर भारतीय जनता पक्षाला हव्या असलेल्या प्रमुख महामंडळांवरील सदस्यांच्या नेमणुकीची छाननी करून निवड अंतिम करण्यात आल्याचे समजते. शिवसेनेला हव्या असलेल्या मुंबईतील महामंडळांबाबत मात्र अद्याप अंतिम निर्णय झाला नसून, या वेळीही शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे मत आहे. पुढील आठवड्यात भाजप व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक होऊन नेमणुका जाहीर करण्याचा मुहूर्त निश्‍चित केला जाईल, असा दावा सूत्रांनी केला.
दरम्यान, भाजपच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांची यादी अंतिम करून ती लवकरच जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आग्रह करण्याची तयारी पक्षाच्या वतीने सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: mumbai news The appointments pending by Shivsena