बॉलिवूडच्या तारांगणात नेतान्याहू हरवले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

मुंबई - अमिताभ बच्चन, अभिषेक-ऐश्‍वर्या, रणधीर कपूर, विवेक ओबेरॉय, सुभाष घई, करण जोहर, शंतनू मोईत्रा, रॉनी स्क्रूवाला अशा मोजक्‍या बॉलिवूड मान्यवरांसह इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बॉलिवूडला दिलेल्या मेजवानीचा कार्यक्रम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत रंगला. महानायक अमिताभ यांच्या उपस्थितीने भारावून गेलेल्या नेतान्याहू यांनी आपण मूक झाल्याची भावना व्यक्त केली.
"मेरे प्यारे दोस्तों, नमश्‍कार शेलॉम', अशी भाषणाची सुरवात करणाऱ्या नेतान्याहू यांनी आपल्यापेक्षा अमिताभ यांचे ट्‌विटर चाहते जास्त आहेत, असे सुरवातीलाच जाहीर केले. "आय लव्ह बॉलिवूड, बॉलिवूडने इस्राईलमध्ये यावे, अशी आमची इच्छा आहे. आमच्याकडे केवळ तासाभराच्या प्रवासात तुम्हाला बर्फाळ प्रदेश, वाळवंट, समुद्र, आधुनिक शहरे, हेरिटेज प्रदेश, रुचकर जेवण असे सारे काही मिळेल. हिंदी चित्रपटसृष्टी आणि इस्राईलचे तंत्रज्ञान एकत्र आले, तर आपण कल्पनेपलीकडील चमत्कार करू. या व्यवसायासाठी आमच्याकडे उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कल्पना मिळतील,' असे नेतान्याहू म्हणाले. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्राईल अशा शब्दांत आपले भाषण संपविणाऱ्या पंतप्रधानांनी आपल्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी जमलेल्या सर्व बॉलिवूड तारकामंडळाला स्टेजवर बोलावले. प्रथम त्यांनीच सेल्फीस्टिक हाती धरली होती; पण नंतर अमिताभ यांनी त्यांचा मान राखत स्वतः सेल्फी काढला.

भारतीय चित्रपटसृष्टीत मुंबईचे स्थान कायमच राहील, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या क्षेत्रात इस्राईलबरोबर सहकार्य व्हावे, असे प्रतिपादन केले. 70 वर्षांपूर्वी चित्रपटक्षेत्राला फारसा मान मिळत नव्हता; पण आज लोकांना एकत्र आणण्यात चित्रपटक्षेत्र मोठा वाटा उचलत आहे. चित्रपटगृहात आपल्याशेजारी कोणत्या जातीचा, धर्माचा माणूस बसला आहे, हे आपण पाहत नाही. अशाच प्रकारे चित्रपट दोन देशांमधील मैत्रीचे धागेही बळकट करू शकतो, असे प्रतिपादन अमिताभ यांनी केले. ज्यू धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या शुक्रवारसाठी शब्बाथ शेलॉम, असे अमिताभने म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Web Title: mumbai news benjamin netanyahu with bollywood star