मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

भाजप- शिवसेनेला 2019 च्या निवडणुकीचे वेध

मुंबई: लोकसभा आणि विधानसभेच्या 2019 मधील निवडणुकांना अद्याप दोन- अडीच वर्षांचा कालावधी आहे. मात्र, भाजप आणि शिवसेना या सत्तेतील भागीदार पक्षांना या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दोन्ही पक्षांकडून लवकरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालट केला जाणार आहे. या विस्तारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील काहींना निश्‍चित डच्चू दिला जाणार आहे, तर काहींना बढती मिळणे अपेक्षित आहे.

भाजप- शिवसेनेला 2019 च्या निवडणुकीचे वेध

मुंबई: लोकसभा आणि विधानसभेच्या 2019 मधील निवडणुकांना अद्याप दोन- अडीच वर्षांचा कालावधी आहे. मात्र, भाजप आणि शिवसेना या सत्तेतील भागीदार पक्षांना या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दोन्ही पक्षांकडून लवकरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालट केला जाणार आहे. या विस्तारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील काहींना निश्‍चित डच्चू दिला जाणार आहे, तर काहींना बढती मिळणे अपेक्षित आहे.

राज्यात भाजप- शिवसेना या दोन पक्षांचे सरकार असले तरीही एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी हे दोन्ही पक्ष सोडत नाहीत. भाजपने देशपातळीवर 2019 ची तयारी सुरू केली आहे. याची नोंद घेत शिवसेनेनेही त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना लोकसभा आणि विधानसभांच्या आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सुमार कामगिरीच्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागणार आहे. शिवाय, ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांना घरी बसवावे लागणार आहे. कारण "पारदर्शक कारभार' या मुद्द्यावर भाजपने जनतेवर भुरळ पाडली आहे. तसेच, या दीड वर्षात दमदार कामगिरी केली तरच पुन्हा सत्तेवर येणे सोपे जाणार आहे, याचे भान भाजप नेतृत्वाला आहे.

शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे यापुढील काळात लढावयाच्या आहेत याचे भान आले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करताना ग्रामीण भागातील, तसेच थेट जनतेतून निवडून आलेल्या सदस्यांना मंत्री करणे गरजेचे असल्याचे समजून चुकले आहे. तसेच, विधान परिषदेचे सदस्य असलेल्या सदस्यांना कॅबिनेट खात्याचे मंत्री केल्याने शिवसेनेच्या विधानसभेतील आमदारांत खदखद आहे. तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर विरोधकांनी आरोप केले आहेत, त्यांना बाहेर काढले जावे, ही शिवसेनेच्या अनेक आमदारांची इच्छा आहे. ही खदखद दूर करून पुढील निवडणुकांत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार शिवसेनेसाठीही महत्त्वाचा आहे. भाजप- शिवसेना मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. केंद्रातील सरकारचा विस्तार झाल्यानंतर लगेच राज्यातील विस्तार होणार आहे. हा विस्तार आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच होणार आहे.

कॉंग्रेसच्या नेत्यामुळे विस्तार लांबणार
कॉंग्रेसमधील कोकणातील एक ज्येष्ठ वजनदार नेता भाजपमध्ये येण्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून रंगली आहे. या नेत्याचा रीतसर भाजपमध्ये प्रवेश लवकरच होईल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. येत्या 27 तारखेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यादरम्यान या नेत्याचा प्रवेश होईल, असे मानले जाते. या नेत्याची दोन मुलेही भाजपमध्ये येणार आहेत. त्यांचे राजकीय पुनर्वसन करताना या वजनदार नेत्याला राज्यातील मंत्रिमंडळात स्थान द्यायचे, की दिल्लीला पाठवायचे, या कोंडीत भाजप सापडला आहे. जर हा नेता राज्यात ठेवला, तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्याला स्थान द्यावे लागेल. असे स्थान दिले तर डोकेदुखी वाढेल. त्यामुळे त्यास दिल्लीला राज्यसभेत धाडणे हा एक विचार भाजप करीत आहे. या नेत्याच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळेदेखील मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याचे सांगितले जाते.

Web Title: mumbai news bjp shivsena and election