बुलडाणा अर्बन बॅंकेची आर्थिक साह्याची हमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

मुंबई - गुंतवणूकदारांना फसवल्याचा आरोप असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अर्थात डीएसके बुधवारीही (ता. 13) उच्च न्यायालयात 50 कोटी रुपये जमा करण्यात अपयशी ठरले; मात्र, बुलडाणा अर्बन बॅंकेने आर्थिक साह्य करण्याची हमी दिली आहे, असा दावा डीएसके यांनी केला आहे. त्यामुळे तूर्तास त्यांना दिलासा मिळाला असून, न्यायालय 22 फेब्रुवारीला निर्णय देणार आहे.

मुंबई - गुंतवणूकदारांना फसवल्याचा आरोप असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अर्थात डीएसके बुधवारीही (ता. 13) उच्च न्यायालयात 50 कोटी रुपये जमा करण्यात अपयशी ठरले; मात्र, बुलडाणा अर्बन बॅंकेने आर्थिक साह्य करण्याची हमी दिली आहे, असा दावा डीएसके यांनी केला आहे. त्यामुळे तूर्तास त्यांना दिलासा मिळाला असून, न्यायालय 22 फेब्रुवारीला निर्णय देणार आहे.

गुंतवणूकदारांनी पुण्यातील पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारींमुळे कुलकर्णी पती-पत्नींनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर बुधवारी न्या. साधना जाधव यांच्यापुढे सुनावणी झाली. बुलडाणा बॅंकेने सुमारे 100 कोटींचे आर्थिक पाठबळ कर्जाच्या स्वरूपात देण्याचे आश्‍वासन दिले आहे. याबाबत प्रस्ताव दिला असून, शनिवारी (ता. 17) त्यावर संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्‍यता आहे, असे डीएसके यांच्या वतीने सांगण्यात आले. याशिवाय, 50 कोटींऐवजी 12 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रेही त्यांनी दाखल केली. लिलावासाठी या मालमत्ता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डीएसकेंना पैसे जमा करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली; तसेच राज्य सरकारने 12 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेऊन गरजू गुंतवणूकदारांना तातडीने पैसे परत करावेत, असा आदेश दिला.

न्यायालय वारंवार याचिकादारांना मुदत देणार नाही; मात्र गुंतवणूकदारांची काळजी असल्यामुळे न्यायालय वेगळ्या प्रकारे हे प्रकरण हाताळत आहे, असेही न्या. जाधव यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार आणि अर्जदारांच्या वतीने आज युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. डीएसके यांचा चौकशीसाठी ताबा मिळावा, अशी मागणी सरकारच्या वतीने करण्यात आली; मात्र एवढे दिवस तुम्ही त्यांच्या ताब्याची मागणी का केली नाही, असा प्रतिप्रश्‍न न्यायालयाने केला. डीएसके यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगाही बुधवारी न्यायालयात उपस्थित होते. या वेळी गुंतवणूकदार आणि जामिनाला विरोध करणारे अर्जदारही होते. गाडीत बसून चौकशीला हजर राहणे सोपे असते; मात्र इथे न्यायालयात या गरजू गुंतवणूकदारांना पाहून कुलकर्णी यांना जाणीव होईल आणि क्‍लेषही होईल, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

गुंतवणूकदारांना सुमारे 232 कोटी रुपयांचे देणे आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी न्यायालयात दिली. गुंतवणूकदारांचे पैसे त्यांनी मुलाच्या व पत्नीच्या बॅंक खात्यात वळवले, असा आरोप सरकारच्या वतीने करण्यात आला. डीएसके यांच्या मुलानेही जामिनासाठी अर्ज केला आहे.

पुन्हा अपयश नको
बुलडाणा बॅंकेच्या प्रस्तावाचे पुरावे तपास यंत्रणेला द्या आणि त्यांच्या निर्णयाची माहितीही द्या, असे निर्देश न्यायालयाने बॅंकेला दिले. सिंगापूरमधील कंपनीच्या प्रस्तावाप्रमाणे हा प्रस्ताव अपयशी ठरता कामा नये, अशी अपेक्षाही न्यायालयाने व्यक्त केली.

Web Title: mumbai news buldhana urban bank dsk financial support