प्रजासत्ताकदिनी संविधान बचाव अभियान

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 जानेवारी 2018

मुंबई - केंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांचे ऐक्‍य होत असताना आता 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी "संविधान बचाव अभियान'ची सुरवात होणार आहे. विविध पक्षांचे प्रमुख नेते, बिगर राजकीय संस्थाचे प्रतिनिधी, साहित्यिक, विचारवंत एकत्र येऊन मंत्रालयाच्या शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा मार्च काढत "संविधान बचाव'चे देशव्यापी अभियान सुरू करण्यात येणार आहे.

खासदार राजू शेट्टी यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, डाव्या पक्षाचे सीताराम येचुरी, तुषार गांधी, फारुख अब्दुल्ला, शरद यादव यांच्यासह विविध क्षेत्रांतील नामवंत सहभागी होणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी बंड केल्यानंतर देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात विविध स्तरावरून विरोध वाढत आहे. देशभरात सुरू असलेले धार्मिक कट्टरतावादाने लोकशाहीवादी वातावरण गढूळ होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या अगोदरही पुरस्कार वापसी करत केंद्र सरकारच्या विरोधात साहित्य क्षेत्रातील नामवंतांनी नाराजी व्यक्त केली होती. आता "संविधान बचाव अभियाना'च्या माध्यमातून अराजकीय व्यासपीठ तयार करून सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जाते. या अभियानाच्या निमित्ताने मंत्रालय ते गेट वे ऑफ इंडिया असा मार्च काढण्यास मरिन लाइन पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली आहे.

Web Title: mumbai news Constitution Rescue Campaign