सालेम, डोसासह सहा दोषी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

आरोपींच्या शिक्षेवर सोमवारपासून युक्तिवाद
मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटप्रकरणी आज विशेष टाडा न्यायालयाने गॅंगस्टर अबू सालेम, मुस्तफा डोसा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविले, तर कय्यूम शेखला दोषमुक्त केले. आरोपींच्या शिक्षेवर सोमवारपासून (जून 19) युक्तिवाद सुरू होणार आहे.

आरोपींच्या शिक्षेवर सोमवारपासून युक्तिवाद
मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटप्रकरणी आज विशेष टाडा न्यायालयाने गॅंगस्टर अबू सालेम, मुस्तफा डोसा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविले, तर कय्यूम शेखला दोषमुक्त केले. आरोपींच्या शिक्षेवर सोमवारपासून (जून 19) युक्तिवाद सुरू होणार आहे.

साखळी बॉंबस्फोट मालिका प्रकरणातील दुसऱ्या टप्प्याचा निकाल विशेष टाडा न्यायाधीश जी. डी. सानप यांनी दिला. त्यांनी अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करिमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले. गुन्हेगारी कट रचणे आणि दहशतवादी कारवायांसह शस्त्रास्त्र कायद्याखाली अबू सालेमला न्यायालयाने दोषी ठरवले, तर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी त्याच्यासह मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट आणि करिमुल्ला खान याला न्यायालयाने दोषी मानले. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने अब्दुल कय्यूमची सुटका केली. एक लाखाचा वैयक्तिक हमी देण्याचे आदेश देत त्याची तात्काळ मुक्ततता करण्याचे आदेश विशेष टाडा न्यायालयाने दिले.

बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 ला पाडली. त्याचा बदला घेण्यासोबतच देशाची आणि विशेषतः मुंबईची अर्थव्यवस्था खिळखिळी व्हावी, या उद्देशाने हे स्फोट घडवून आणल्याचा सीबीआयचा दावाही न्यायालयाने मान्य केला आहे. या बॉंबस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण जखमी झाले होते.

सालेमने 1993 मध्ये गुजरातला जाऊन नऊ एके-56 रायफल्स आणि 100 ग्रेनेड्‌स घेतले होते. अभिनेता संजय दत्त, झैबुनीसा काझीच्या घरात त्यापैकी काही शस्त्रे ठेवली होती. अनिस इब्राहिमच्या इशाऱ्यावरून हा शस्त्रसाठा या दोघांकडे ठेवला असल्याचा सरकारचा दावा विशेष न्यायालयाने मान्य केला आहे. परंतु, या कृत्यासाठी अबू सालेमला फाशी देता येणार नाही. पोर्तुगालकडून फाशीची शिक्षा न देण्याच्या अटीवर त्याचे प्रत्यार्पण झाल्यामुळे, त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी यासाठी विशेष न्यायालयात युक्तिवाद करू, असे विशेष सरकारी वकिल दीपक साळवी यांनी सांगितले. तर, हवाला ऑपरेटर ताहीर मर्चंटने स्वतःचे दुबईतील घर सहआरोपींना शस्त्र प्रशिक्षणाच्या शिबिराला जाण्याआधी वास्तव्यास दिल्याचा उल्लेखही न्यायालयाने निकाल देताना केला.

सालेम शांत, तर मुस्तफाच्या चेहऱ्यावर तणाव
निकाल वाचनादरम्यान अबू सालेम शांत होता, त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नव्हते; तर मुस्तफा डोसाच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्ट दिसत होता. न्यायालयातील आरोपींच्या पिंजऱ्यात बसलेल्या बाकड्यावर मुस्तफा डोसा काहीतरी पुटपुटत होता. तर न्यायालयाने दोषमुक्त केल्याचे जाहीर करताच अब्दुल कय्यूमचा गोरा चेहरा आनंदाने खुलून गेला. आरोपींच्या रांगेत सर्वात शेवटी बसलेला अबू सालेम आणि त्याच्या बाजूला बसलेला मुस्तफा डोसा वगळता इतर आरोपी मात्र न्यायाधीश काय सांगत आहेत, हे ऐकण्यासाठी बाकड्यावरून अधूनमधून उभे होते.

कडक सुरक्षा
वकील, पोलिस आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भरलेल्या सत्र न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरील विशेष टाडा न्यायालयात सुरक्षाव्यवस्था कडक होती. वकिलांना, पोलिसांना कोर्टरूममध्ये फोन, पेन घेऊन जाण्यास मुभा दिली होती. प्रसारमाध्यम प्रतिनिधींना वही, पेन्सिल आणि ओळखपत्राशिवाय काहीही आणण्यास परवानगी नव्हती. आरोपींचे नातेवाईकही कोर्ट रूमच्या बाहेर उपस्थित होते. निकाल वाचन पूर्ण झाल्यानंतर एका आरोपीच्या फक्त दोन नातेवाइकांना कोर्टात आरोपीसोबत बोलण्यासाठी सोडले जात होते.

Web Title: mumbai news crime on salem dosa