नदी बचाव मोहिमेत राज्य सहभागी होणार: मुख्यमंत्री फडणवीस

tree plantation
tree plantation

ठाणे : जल, जंगल आणि जमीन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊले उचलली असून यामुळे येणाऱ्या काही वर्षांत पर्यावरणाचे फायदे दिसून येण्यास सुरुवात होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी येथे सांगितले. ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आज त्यांच्या उपस्थितीत ऐरोली येथे झाला यावेळी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री एकनाथ शिंदे, सदगुरु जग्गी वासुदेवजी, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम,आदींची उपस्थिती होती.

ऐरोली सेक्टर १० येथे कोस्टल एंड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटरच्या प्रांगणात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ताम्हण या राज्य पुष्पाचे रोपटे, तर नितीन गडकरी व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपळ, तर सुधीर मूनगंटीवार आणिसद्गुरू जग्गी वासुदेवजी यांच्या हस्ते कडुलिंबाचे रोपटे लावण्यात आले. यावेळी मुसळधार पाउस सुरु असतांना देखील उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, नागरिक यांचा रोपे लावण्याचा उत्साह कमी झाला नव्हता. 

नदी बचाव मोहिमेतही सहभागी होणार
जग्गी वासुदेवजी यांनी नदी बचाव मोहिमेची देशव्यापी सुरुवात केली असून महाराष्ट्र देखील या मोहिमेत आघाडीवर असेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिली. आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, सुधीरभाऊंनी झाडे लावण्याचा जो निर्धार केला आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील वनांचे आच्छादन ३३ टक्के झाल्याशिवाय राहणार नाही. मागील वर्षी २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य असतांना अडीच कोटी वृक्ष लागवड करण्यात आली.

वनविभागाच्या वृक्षारोपणाकडे पूर्वी जुन्याच खड्यांमध्ये नवी रोपे लावतात असे उपरोधाने म्हटले जायचे, पण वनविभागाने कात टाकली असून नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. खड्डे खोद्ण्यापासून ते रोपे लावणे आणि ते जगविणे या सर्वांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात येते. प्रत्येक रोपांचे जिओ टॅगिंग केले जात आहे.

जलयुक्त शिवार योजनेतून अनेक नाहीसे झालेले स्त्रोत जिवंत करण्याचे काम सुरु आहे तसेच गाळ्मुक्त धारण आणि गाळयुक्त शिवार या योजनेत जमिनीचा कस कसा वाढेल आणि ती सुपीक कशी होईल असा प्रयत्न आम्ही करीत आहोत असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

अनुकरण देशभर व्हावे
याप्रसंगी बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वन विभागाच्या कामाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, अतिशय कमी कालावधीत नियोजनबध्द पद्धतीने हाती घेतलेल्या या मोहिमेचे अनुकरण देशभर इतर राज्यांनी देखील करावे.देशभरातील राष्ट्रीय महामार्गालगत देखील आम्ही मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याचे नियोजन केले आहे असे ते म्हणाले.

आगामी काळात पर्यावरणपूरक इंधनावर आम्ही भर देणार असून नागपुरात आम्ही बायो इथेनॉलवर चालणारया ५५ बसेस सुरु केल्या आहेत. देशात अगरबत्तीच्या व्यवसायासाठी ४० हजार कोटीचे लाकूड आयात होत असून ४ हजार कोटीच्या काड्या आयात होतात, पण आता गडचिरोली येथे सुधीरभाऊनी अगरबत्ती उत्पादनासाठी तेथीलच जंगलातील बांबू व इतर लाकूड याचा उपयोग करुन क्लस्टर सुरु केले आहे त्याचा निश्चितच फायदा स्थानिक उद्योगाला होईल. बांबूचा देखील चांगला उपयोग आपण करून घेऊ शकतो असे ते म्हणाले. जग्गी वासुदेवजी यांनी देखील या मोहिमेची प्रशंसा करून आपल्या नदी बचाव मोहिमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.

राज्य ३३ टक्के हरित करणारच
प्रारंभी वनमंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी आपल्या प्रास्ताविकात पुढील तीन वर्षांत वन विभागाच्या माध्यमातून ५० कोटी झाडे कोणत्याही परिस्थितीत लावणार असे सांगून या चालू सप्ताहात ४ कोटींपेक्षा जास्त रोपे लावूत अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या राज्यात २० टक्यांपेक्षा देखील कमी हरित क्षेत्र आहे. पण या मोहिमेनंतर हे हरित क्षेत्र वाढून ३३ टक्के होणारच. ऐरोली येथील हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी दृष्टिहीन शाळकरी मुलांनी उत्साहात रोपे लावली त्याचा उल्लेखही त्यांनी केला. १६ कोटी ६० लाख रोपटी आत्ता नर्सरीत तयार आहेत असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी जग्गी वासुदेवजी यांच्या ईशा फौन्डेशन समवेत वृक्षारोपणाचा करार करण्यात आला. विश्वस्त कृष्णा अरुप, सामाजिक वनीकरणचे प्रधान मुख्य वन संरक्षक अनुराग चौधरी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

संत तुकाराम वनग्राम पुरस्कार प्रदान
याप्रसंगी सावनेर तालुक्यातील सोनापूर गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला १० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार देण्यात आला तर ५ लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार विभागून निलंगा तालुक्यातील लांबोटा आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातील पवनपार संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आला. ३ लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार विभागून गोंदिया जिल्ह्यातील नवाटोला आणि भोकर तालुक्यातील बेंबर संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आला. १ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून हिंगोलीतील आंगणवाडा संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आले.

माहितीपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन
याप्रसंगी “महाराष्ट्रातील सागरी जैवविविधता –एक परिचय हे आयझेक किहीमकर व सुप्रिया झुनझुनवाला लिखीत पुस्तक, “कोल्हापूर वनवृत्तातील रेस्क्यू ऑपरेशन” तसेच अपर प्रधान मुख्य वन संरक्षक एन वासुदेवन यांनी लिहिलेल्या “ हिस्ट्री ऑफ मॅन्ग्रोव्हज” पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.

बायकर्स रॅली
यावेळी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते बायकर्स रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. २२ बायकर्स हे वृक्षारोपणाचा संदेश देत राज्यातील जिल्ह्यांतून फिरणार असून ७ तारखेस ठाणे येथे समारोप होणार आहे.

आजच्या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, गणपत गायकवाड, मुख्य सचिव सुमित मल्लिक, श्रीमती सपना मुनगंटीवार, महापौर सुधाकर सोनवणे आदींची उपस्थिती होती. वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी यावेळी आभार मानले. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
12 सिंहांच्या गराड्यात तिने दिला बाळाला जन्म
शेतकरी विधवा महिलांनी काढली मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा
मारुतीच्या मोटारी 3 टक्क्यांनी स्वस्त
मेस्सी बालपणीच्या मैत्रिणीसोबत विवाहबंधनात
अनंतनाग: सुरक्षारक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक

पुतनामावशीची कणव
'जीएसटी' देशभरात लागू; संसदेत ऐतिहासिक सोहळा​
'जीएसटी': सामान्य माणसास अल्पकाळ बोचणारा!​
धुळ्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात तयार केले मोटरसायकलचे कोळपे​
धुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ
असाही एक शिक्षणाच्या भक्तीचा मार्ग (वारीच कोंदण)​
भारताचा विंडीजवर 93 धावांनी विजय; मालिकेत 2-0 ने आघाडी​
‘सीएम’चा ‘पिंपळ’ बकरीने खाल्ला​
'जीएसटी'ला तमाशाचे स्वरूप : राहुल गांधी​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com