बळिराजाच संपावर...

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 जून 2017

चर्चा निष्फळ; कर्जमाफी, योग्य भावाची मागणी

चर्चा निष्फळ; कर्जमाफी, योग्य भावाची मागणी
मुंबई - पावसाच्या हलक्‍या सरी सुरू झाल्यावर सुखावणारा शेतकरी राजा यंदा मात्र रुसला असून, पावसाच्या चाहुलीबरोबर नव्या दमाने शेताने जाणाऱ्या बळिराजाने नांगर खाली ठेवला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला आज (बुधवार) मध्यरात्रीपासून सुरवात झाली. शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य भाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

शेतकरी संपावर जात असल्याने दूध, भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर 60 ते 70 टक्‍के परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने राज्य सरकार धास्तावले आहे. मात्र सरकारच्या विविध विभागांमधील समन्वय अभावामुळे शहरातील दूध, भाजीपाला पुरवठ्यावर संपाचा परिणाम होऊ नये यासाठी सरकारकडून कशा प्रकारची काळजी घेण्यात येत आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरची मंगळवारी रात्री उशिरा चर्चा फिसकटल्यानंतर "किसान क्रांती'ने आपला संपाच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्धार केला. ऐन खरिपाच्या तोंडावर हा संप होत आहे. तीन वेळा प्रयत्न करूनही सरकारला संप रोखण्यात यश आले नाही. "किसान क्रांती'चे समन्वयक धनंजय दोर्डे पाटील यांनी, संपाला राज्यातील सर्व बाजार समित्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तसेच शेतकऱ्यांचा या संपाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून, सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आमचा हा संप बेमुदत सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

संपाच्या परिणामस्वरूप भाजीपाल्यासह दूधपुरवठा तत्काळ प्रभावित होण्याची शक्‍यता असून, या पार्श्‍वभूमीवर मुंबई, पुणे, नागपूर आदी महानगरांत शेतीमाल ग्राहक दरात वाढ दिसून आली आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी, शेतकऱ्यांचे भांडण सरकारशी आहे, त्यासाठी आमच्याशी चर्चा करावी, असे सांगत दूध आणि भाजीपाला नाशवंत असतो तो शेतकरी फेकून देणार का, असा प्रश्‍न केला. शेतकऱ्यांनी स्वत:चेही नुकसान करू नये आणि शहरी नागरिकांनाही वेठीस धरू नये, असे आवाहन त्यांनी केले. मात्र शेतकऱ्यांच्या संपाचे परिणाम जाणवू नयेत यासाठी कशाप्रकारची उपाययोजना करण्यात आलेली आहे, यावर त्यांनी त्याविषयी आपल्याला काहीही माहिती नसल्याचे मोघम उत्तर दिले.

राज्यभरातील शेकडो ग्रामपंचायतींनी संपात सहभागी होण्याबाबत आधीच ठराव केले आहेत. मुंबईतील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर संप करण्याचा पुनर्निर्धार राज्यातील गावागावांत बुधवारी करण्यात आला. अनेक गावे, काही शहरेही संपास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी बंद राहणार असल्याची माहिती आहे. विविध शेतकरी, व्यापारी, हमाल, विक्रेते, दूध, बाजार समित्या, संघ, संघटना आदींनीही संपास पाठिंबा दिला असून, शेतकरी संघटनांनी शहरांकडे जाणारा शेतीमाल रोखण्याचा इशाराही दिला आहे. संपाच्या काळात फळे, भाजीपाला, दूध आणि इतर शेतीमाल बाजारात विक्रीला न आणण्याची शेतकऱ्यांची रणनीती आहे. त्याचबरोबर शेतीतील कोणतीही कामेही करायची नाहीत, असाही निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांचे भांडण सरकारशी आहे, त्यासाठी आमच्याशी चर्चा करावी. त्यांनी स्वत:चेही नुकसान करू नये आणि शहरी नागरिकांनाही वेठीस धरू नये.
- पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री

Web Title: mumbai news farmer on strike