रिसॉर्टवर जाऊच, पण आधी डॉक्टरांना भेटू ! 

हर्षदा परब
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

आजी-आजोबा चिंतामुक्त 
आराध्याचे अंधेरीचे आजी-आजोबा शशिकला बिरादर-प्रकाश बिरादर दीड वर्षांपासून तिच्यासमोर चेहऱ्यावर हास्य आणत होते; पण आतून त्यांना चिंतेनं ग्रासलं होतं. आता त्यांची चिंता मिटली आहे. त्यांच्या मनात आणि चेहऱ्यावरही आनंद आहे. आराध्याला नवजीवन मिळालं आहे.

मुंबई - असाध्य हृदयरोग झालेल्या चार वर्षांच्या आराध्याला दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवं हृदय मिळालं. भरारी घेण्यासाठी जणू तिला नवे पंख मिळाले; परंतु हृदय प्रत्यारोपणासाठी नेताना, ‘आपण तेथून रिसॉर्टला जाऊ’, अशी तिची समजूत काढण्यात आली होती.

खरं तर आराध्याने काही दिवसांपासून रिसॉर्टला जाण्याचा हट्टा धरला होता. प्रत्यारोपणासाठी हृदय मिळाल्याचा फोन आला त्या वेळी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करणं अपेक्षित होतं. ‘आपल्याला रिसॉर्टला जायचंय ना, मग रक्ताचे रिपोर्ट डॉक्‍टरांना दाखवले की ते रिसॉर्टला जाण्याची परवानगी देतील’ अशी समजूत काढून आराध्याला मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे तिचे वडील योगेश मुळे यांनी सांगितलं. 

आराध्याला चटपटीत खायला, तारक मेहता का उल्टा चष्मा ही सिरियल बघायला, फिरायला, विशेषतः मॉलमध्ये फिरायला आवडतं. आराध्याला आजार जडल्यानंतर रुग्णालयाच्या फेऱ्या वाढल्याच होत्या. काही महिन्यांपासून तिची प्रकृती सतत बिघडत होती. तिला दर १५ दिवसांनी रुग्णालयात दोन-तीन दिवस दाखल करावं लागायचं. रुग्णालयाला गमतीनं तिचे कुटुंबीय ‘दुसरं घर’ म्हणायचे. रुग्णालयात जाणं तिच्यासाठी त्रासदायक होतं. ती तयार नसे. तिची समजूत काढावी लागत असे. हृदय प्रत्यारोपणासाठी नेतानाही तिची समजूत काढावी लागली. ‘आराध्या बरी झाल्यावर डॉक्‍टरांची परवानगी घेऊन आम्ही तिला रिसॉर्टला नेणार आहोत’, असे तिचे वडील योगेश यांनी सांगितलं.  

आराध्यावर हृदय प्रत्यारोपणाची आवश्‍यकता होती. प्रत्यारोपणासाठी केव्हा हृदय मिळेल, याचा अंदाज बांधणं कठीण. रुग्णालयातून केव्हाही फोन येऊ शकतो, असं गृहित धरून कमी वेळेत मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात पोहोचता यावं म्हणून तिची आई तिच्यासह अंधेरीला माहेरी राहत होती. तेथे तिच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता आराध्याला संसर्ग होऊ नये आणि आराम मिळावा म्हणून तिला तिच्या नवी मुंबईच्या घरी नेण्यात येणार आहे. ‘आराध्या गुंगीत आहे. काही दिवसानंतर तिला सर्वसाधारण वॉर्डमध्ये हलवण्यात येईल. १५ दिवसांत डिस्चार्ज मिळाला की, तिला घरी नेणार आहोत. त्यासाठी आराध्याच्या आवडी-निवडींचा विचार करून घराचे नूतनीकरण करण्यात येत आहे, असं तिचे वडील म्हणाले. 

Web Title: mumbai news Heart Transplant Aaradhya Mule