जिग्नेश-सेटलवाड एकत्र? 

जिग्नेश-सेटलवाड एकत्र? 

मुंबई - गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांनी ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत तिस्ता सेटलवाड यांची गुरुवारी (ता. 4) भेट घेतली. भाईदास सभागृहात सभेसाठी जिग्नेश मुंबईत आले होते. जुहू येथील निवासस्थानी त्यांची आणि सेटलवाड यांची भेट झाली, असे सूत्रांनी सांगितले. सेटलवाड यांनी गोध्रा दंगलींना सातत्याने विरोध केला होता. जिग्नेश यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध असून नरेंद्र मोदीप्रणीत राजकारणाचा विरोध हे दोघांमधील समान सूत्र आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या भेटीला दुजोरा दिला. दुपारी उशिरा प्रवेशबंदीची नोटीस मिळाल्यानंतर जिग्नेश मुंबईतून निघून गेले. 

दलित, पददलित, वंचित समूहांना एकत्र आणणे, त्यांना त्यांच्या राजकीय हक्‍कांची जाणीव करून देणे आवश्‍यक असून बाहेरची मंडळी आणून केवळ चमत्काराचे प्रयोग करता येतील, अशी भावना विचारवंत कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केली आहे. बाहेरच्यांच्या येण्यामुळे केवळ कार्यक्रमात गोंधळ उडेल आणि तणाव पसरवण्यासाठीच बाहेरची मंडळी आणली जात आहेत, असा आरोप तेवढा सहन करावा लागेल. चळवळीचे भले होणार नाही, असे काही ज्येष्ठांचे मत आहे. नामांतराच्या आंदोलनानंतर प्रथमच झालेल्या ऐतिहासिक बंदच्या पार्श्‍वभूमीवर आता वंचितांच्या ऐक्‍याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. जिग्नेश, अल्पेश ठाकोर आदींना आणून आंदोलनाचा प्रवाह अन्यत्र वळवू नका, अशी भावना नेत्यांनी आंदोलनाचे अध्वर्यू प्रकाश आंबेडकरांना कळवली आहे. रिपब्लिकन राजकारणात सर्वात महत्त्वाचा गट मानल्या गेलेल्या आठवले गटाने सामाजातील असंतोष जाणून घेण्यासाठी तातडीने कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. 

वंचितांच्या समूहांची काळजी घेण्यासाठी सरकारवर दबाव ठेवणारा मतदार गट तयार करणे ही आंबेडकरी चळवळीची गरज असल्याचे मत मांडले जात आहे. "सकाळ'शी बोलताना या उद्रेकाचा चेहरा झालेल्या प्रकाश आंबेडकर यांनी हा केवळ दलित संघटनांनी केलेला बंद नव्हता, तर ओबीसी समाजातील वंचितांनीही पाठिंबा दिल्याने तो यशस्वी झाल्याचे सांगितले. आज संपूर्ण दिवसभर पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेने एकत्र येण्याची हाक दिली जात होती. दलित समाजातील सर्वात लोकप्रिय मानले जाणारे रामदास आठवले हिंदुत्ववादी सरकारमध्ये असल्याने ती पोकळी प्रकाश आंबेडकर भरून काढत असल्याची चर्चा दिवसभर होती. ते स्वत:च ऐक्‍यासाठी पुढाकार घेऊन गुरुवारी समविचारी पक्षांशी चर्चा करणार, असे बोलले जात होते. मात्र, आठवले यांचे विश्‍वासू सहकारी अविनाश महातेकर आणि आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते विचारवंत अर्जुन डांगळे यांनी आपल्याला निरोप मिळाला नसल्याचे सांगितले. 

आठवलेंना इशारा 
आठवले सध्या सत्तेच्या वळचणीला गेले आहेत खरे; पण मंत्रिपदापेक्षा आंबेडकरी चळवळीची अस्मिता महत्त्वाची असल्याचे ध्यानात ठेवा, असा सूचक इशारा अर्जुन डांगळे यांनी दिला आहे. दरम्यान, बाहेरच्या मंडळींना भाषणासाठी आणून उपयोग होणार नाही. येथील वंचितांची चळवळ उभी करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे आंबेडकरवादी चळवळीचे पाईक ज. वि. पवार म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com