पाटील, तावडे, दातार यांना जीवनगौरव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

मुंबई - तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छत्रपती पुरस्कारांना सोमवारी अखेर मुहूर्त मिळाला. क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी 2014-15, 2015-16, 2016-17 अशी तीन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये एकूण 195 खेळाडू, मार्गदर्शक, संघटक आदींना गौरवण्यात येणार आहे. येत्या शनिवारी (ता. 17) गेटवे ऑफ इंडिया येथे पुरस्कार वितरण सोहळा राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.

गेली तीन वर्षे राज्य क्रीडा पुरस्कार रखडले होते. नव्या सरकारने पुरस्काराच्या नियमावलीत बदल करून दरवेळे होणारे वाद टाळण्यासाठी ऑनलाइन अर्ज आणि हरकती मांडणे अशा नव्या पद्धतीचा अवलंब केला. याविषयी तावडे म्हणाले, 'पुरस्कार निवडीत पारदर्शकता यावी, या एकमात्र हेतूने आम्ही ऑनलाइन पद्धत अवलंबली. सुरवातीला ती कठिण वाटली. पण, प्रत्येकाने संयम बाळगत या पद्धतीचा उपयोग केला. अर्ज आल्यानंतर त्याची छाननी करून ते संकेतस्थळावर जाहीर करून त्याविषयी हरकती मागितल्यामुळे अत्यंत पारदर्शकपणे आम्ही तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर करू शकलो.'' जीवन गौरव पुरस्कारार्थींना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, रोख तीन लाख, खेळाडू, कार्यकर्ता, मार्गदर्शकांना सन्मानपत्र स्मृतिचिन्ह आणि रोख एक लाख रुपये असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.

नामांकित
खेळातील आपल्या कामगिरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचा गौरव उंचावणाऱ्या खेळाडूंना या वेळी नामांकित म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. ग्रॅंडमास्टर अक्षयराज कोरे, विदित गुजराथी, पुण्याची आकांक्षा हगवणे, टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे, हॉकीपटू युवराज आणि देवेंदर वाल्मिकी बंधू, क्रिकेटपटू रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे, राष्ट्रकुल स्पर्धा गाजवणारे ओंकार ओतारी आणि गणेश माळी, कबड्डीतील आशियाई विजेत्या अभिलाषा म्हात्रे आणि किशोरी शिंदे, एव्हरेस्टवीर आशिष माने, रोईंग खेळाडू दत्ता भोकनळ, सात समुद्र पार करणारा रोहन मोरे आणि ऍथलेटिक्‍समध्ये आपले जीवन समर्पित करणाऱ्या गुरबन्स कौर यांचा यात समावेश आहे.

समर्पितांचा गौरव
क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी आपले उभे आयुष्य समर्पित करणाऱ्या ऍथलेटिक्‍समधील रमेश तावडे, योगा आणि सूर्यनमस्काराचा प्रसार करणाऱ्या अरुण दातार, शरीर सौष्ठवतेचे महत्त्व पटवणाऱ्या बिभिषण पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

काहीशी त्रस्त पद्धती
शासनाने पुरस्कार निवडीत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाइन पद्धती अवलंबल्याचे स्वागत करण्यात आले. पण, त्याचवेळी अर्जदारांना संकेतस्थळावर अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांची फाईल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातही सादर करण्यास सांगण्यात आले होते. संकेतस्थळावर माहिती दिल्यानंतर फाईल सादर करण्याचे कारण काय ? असा प्रश्‍न क्रीडा क्षेत्रात उपस्थित करण्यात आला होता. यामुळे पुरस्कारासाठी अर्ज करण्याची ही पद्धत त्रासदायक ठरल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले होते.

थेट पुरस्कार अधिक
तीन वर्षांसाठी एकूण 776 जणांनी अर्ज केले होते. या अर्जांची छाननी करून त्यातील तीन वर्षांसाठी मिळून विविध पुरस्कारांसाठी एकूण 141 हरकती शासनाकडे आल्या. त्यातून 195 खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले आहे. या पुरस्कारांमध्ये थेट पुरस्कारांची संख्या अधिक आहे. तब्बल एकूण 69 थेट पुरस्कार देण्यात आले असून, यात 42 खेळाडू आणि 27 क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे क्रीडा मार्गदर्शक म्हणून पुरस्कार मिळालेले बहुतेक पुरस्कार्थी हे थेट पुरस्कारातच पात्र ठरले आहेत. क्रीडा मार्गदर्शक म्हणून एकूण 32 पुरस्कार देण्यात आले आहेत.

आट्या पाट्यावर कृपा
क्रीडा क्षेत्रातून आट्या पाट्या हा खेळ अस्ताला गेला असला, तरी या खेळासाठी शिवछत्रपती पुरस्कार देण्याची परंपरा या वेळीदेखील कायम राहिली आहे. जिल्हा, राज्य संघटनादेखील अस्तित्वात आहेत की नाही याची माहिती नाही. तरीदेखील या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा होतात असे गहत धरून हे पुरस्कार दिले गेले की काय ? असा प्रश्‍न यादी जाहीर झाल्यावर पुन्हा उभा राहिला आहे. सर्वांत कडी म्हणजे संघटक कार्यकर्ता पुरस्कारासाठी अर्ज करताना एका पुरस्कारार्थीने 2014-15 मध्ये रंगून, भूतान येथे या खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्याची माहिती अर्जात सादर केली आहे. जेथे राष्ट्रीय स्पर्धा होत नाहीत, तेथे आट्या पाट्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्याचे पाहून अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

पुरस्कार रचना (तीन वर्षे)
जीवनगौरव पुरस्कार (3), छत्रपती क्रीडा पुरस्कार (127), मार्गदर्शक (31), जिजामाता पुरस्कार मार्गदर्शक (1), जिजामाता संघटक-कार्यकर्ते पुरस्कार (2), छत्रपती संघटक-कार्यकर्ते पुरस्कार (19), साहसी पुरस्कार (5), एकलव्य पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) (7)

Web Title: mumbai news maharashtra bibishan patil arun datar ramesh tawde jeevangaurav award