कॉंग्रेस - 'राष्ट्रवादी'चे जुळले सूर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर सरकारचा पाठिंबा काढून घेत राष्ट्रपती राजवट लावण्यास कारणीभूत ठरलेल्या राष्ट्रवादीने कॉंग्रेस सोबत आघाडी करण्याची मनोमन तयारी केली आहे. या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी मंगळवारी पार पडली. यामध्ये आगामी विधानसभा निवडणुका एकत्रपणे आघाडीनेच लढण्याचा निर्धार व्यक्‍त करत "पुन्हा तुझ्या गळा माझ्या गळा' असा सूर आळवला.

धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये यासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादीने एकत्रपणे निवडणुका लढण्यावर एकमत केले. या बैठकीला कॉंग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तर राष्ट्रवादीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार व विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

राज्यभरात भाजप विरोधात समविचारी पक्षांची मोट बांधण्याची तयारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरू केली आहे. मागील वर्षी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रपणे संघर्ष यात्रादेखील काढली होती. त्यानंतर कॉंग्रेसने नागपूर येथील एल्गार यात्रेत "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रमुख सभा घेतली होती. त्यामुळे, निवडणुकीच्या दरम्यान विभक्‍त झालेली आघाडी पुन्हा एकत्र येत असल्याचे चित्र निर्माण होत होते.

नेत्यांनी आघाडी करण्यास संमती दर्शवलेली असली तरी याबाबतचा निर्णय दिल्लीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये होणार आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीत आघाडीच्या अंतिम निर्णयावर शिक्‍कामोर्तब होईल असे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी या वेळी स्पष्ट केले.

कॉंग्रेसचा गुजरात पॅटर्न
दरम्यान, कॉंग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पक्षाची वाताहात करण्यात यश मिळवले आहे. याचाच भाग म्हणून महाराष्ट्रातही त्याच पद्धतीने पक्षसंघटन मजबूत करताना समविचारी पक्षांसोबतच अराजकीय संस्था, संघटना व नेत्यांना सोबत घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. आज टिळक भवन येथे यासाठी कॉंग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या वेळी अराजकीय संस्था, संघठना, पुरोगामी विचारांच्या व्यक्‍ती उपस्थित होत्या.

Web Title: mumbai news maharashtra news congress ncp politics