राज्यात सरकारी कर्करोग रुग्णालये

विजय गायकवाड
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद येथील सरकारी कर्करोग रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. यामुळे केंद्र सरकारच्या कुटुंब व आरोग्य कल्याण मंत्रालयाकडून 120 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या निधीतून प्रत्येक विभागाचे अद्ययावतीकरण, आवश्‍यक उपकरणे, इमारत विस्तारीकरण अशी कामे केली जाणार आहेत.
- डॉ. के. एस. शर्मा, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक (शिक्षण)

मुंबई - मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयाच्या धर्तीवर औरंगाबादमध्ये शासकीय कर्करोग रुग्णालयाची यशस्वी उभारणी केल्यानंतर चंद्रपूरमध्येही सरकारी कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीच्या चाचपणीला वेग आला आहे. भविष्यात राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अखत्यारीत अत्याधुनिक कर्करोग रुग्णालये उभारण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. कर्करोगविरोधी लढ्यामध्ये महाराष्ट्राची आघाडी असून, भविष्यात कर्करोग रुग्णांसाठी प्रत्येक विभागात टाटा कर्करोग रुग्णालयासारख्या सुविधा उभारण्यात येणार आहेत.

टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या सहकार्याने राज्य सरकारच्या कर्करोग रुग्णालयांची उभारणी होत असून, औरंगाबादमधील शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीनंतर चंद्रपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबादचे राज्य सरकारी कर्करोग रुग्णालय खानदेश, विदर्भ व मराठवाड्यातील गरीब जनतेसाठी उपयोगी ठरत असल्याने राज्य सरकारचा कर्करोग सेवा विस्तारीकरणाचा मानस आहे. ज्या कर्करुग्णांना मुंबईत येऊन टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये जाणे, राहणे शक्‍य नाही, त्यांच्यासाठी औरंगाबादच्या राज्य सरकारी कर्करोग रुग्णालयातील सुविधा फलदायी ठरत आहेत, असे टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक (शिक्षण) डॉ. के. एस. शर्मा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने औरंगाबादमध्येच झालेल्या 2016 च्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा बहाल केला. ज्येष्ठ उद्योजक जे.आर.डी. टाटा यांनी मुंबईत कर्करुग्णांसाठी उभारलेल्या आशिया खंडातील पहिल्या टाटा मेमोरियल रुग्णालयाशी ते संलग्न आहे. टाटा रुग्णालयात कर्करुग्णांवर मुंबईत ज्या प्रकारे उपचार होतो, अगदी तशाच प्रकारे अद्ययावत यंत्रसामग्री, तज्ज्ञ डॉक्‍टर, प्रशिक्षित कर्मचारी हे या औरंगाबादमधील रुग्णालयाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने नुकतेच राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना आदेश जारी केले असून, या प्रकल्पाचे सल्लागार व समन्वयक म्हणून टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक (शिक्षण) डॉ. के. एस. शर्मा यांची नेमणूक झाली आहे.

मराठवाड्यात रुग्णसेवेचे केंद्र
मराठवाड्यातील रुग्णसेवेचे केंद्र घाटी (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय) सर्वांना परिचित आहे. "घाटी'च्या श्रेणी वर्धनांतर्गत राज्यातील पहिले, मराठवाड्यातील एकमेव अशा सरकारी कर्करोग रुग्णालयाची निर्मिती पाच वर्षांपूर्वी (21 सप्टेंबर 2012) झाली. 2008-2009 च्या विशेष आर्थिक तरतुदीत 100 खाटा, अतिदक्षता विभागासाठी 10 खाटा, अद्ययावत शस्त्रक्रियागृहे, बाह्य रुग्ण विभाग, किरणोपचार विभागात अत्याधुनिक अशा लिनीयर ऍक्‍सिलेटर, सिटी सिम्युलेटर, ब्रेकीथेरपी यंत्रे कार्यान्वित झाली. त्यामुळे स्थापनेपासून ऑगस्ट 2017 अखेरपर्यंत दोन लाख 21 हजार 673 रुग्णांना सहज, कमी खर्चात उपचार मिळाल्याने उपचार खर्च त्यांच्या आवाक्‍यात झाला. दीड लाखाहून अधिक बाह्य रुग्णांची तपासणी करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news maharashtra news government cancer hospital