राज्याची केंद्राकडे 200 कोटींची मागणी - फुंडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मुंबई - विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गेल्या चार दिवसांत साधारणत: एक लाख 90 हजार हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सुमारे 1800 गावांचा त्यात समावेश आहे. केंद्र सरकारकडे 200 कोटी रुपयांची मदत देण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार उपस्थित होते.

फुंडकर म्हणाले, 'शनिवार व रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे 16 जिल्ह्यांतील 61 तालुक्‍यांतील 1279 गावांमधील एक लाख 27 हजार 322 हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. मात्र 12 फेब्रुवारी रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सहा जिल्ह्यांतील 20 तालुक्‍यांतील 595 गावांतील 61 हजार 361 हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. बुलडाणा, नांदेड, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या भागात काल झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत अंतिम अहवाल पुढील दोन दिवसांत प्राप्त होईल.''

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चा झाली. फळ व शेती पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामानआधारित फळपीक विमाअंतर्गत गारपिटीचा विकल्प दिला आहे अशा शेतकऱ्यांसाठी विमा योजनेतून रक्कम देण्यात येईल.

ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा काढला नाही; परंतु गारपिटीने त्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना "एनडीआरएफ'च्या निकषानुसार प्रतिहेक्‍टरी 18 हजार रुपयांच्या मर्यादेत मदत देण्यात येईल, असेही फुंडकर यांनी सांगितले.

मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या जिरायत पिकांसाठी (ज्वारी, मका, गहू, हरभरा, सूर्यफूल) प्रतिहेक्‍टरी 6800 रुपये तर सिंचनाखालील जमिनीबाबत 13 हजार 500 रुपये मदत देण्यात येईल. नुकसानीबाबत पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल, असे ते म्हणाले.

अशी असेल मदत...
- मोसंबी व संत्रा - 23 हजार 300 रुपये प्रतिहेक्‍टरी
- केळी - 40 हजार रुपये प्रतिहेक्‍टरी
- आंबा - 36 हजार 700 रुपये प्रतिहेक्‍टरी
- लिंबू - 20 हजार रुपये प्रतिहेक्‍टरी

जिरायत पिकांसाठी (ज्वारी, मका, गहू, हरभरा, सूर्यफूल)
- प्रतिहेक्‍टरी 6800 रुपये
- सिंचनाखालील जमिनीबाबत 13 हजार 500 रुपये

सोमवारी झालेल्या पावसामुळे झालेले नुकसान
- नांदेड - 20 हजार 177 हेक्‍टर
- हिंगोली - 140 हेक्‍टर
- उस्मानाबाद - 21 हजार 925 हेक्‍टर
- परभणी - 4984 हेक्‍टर
- नागपूर - 10,260 हेक्‍टर
- चंद्रपूर - 2150 हेक्‍टर
- वर्धा - 1725 हेक्‍टर

Web Title: mumbai news maharashtra news hailstorm 200 crore demand state government pandurang phundkar