राज्यात हुक्का पार्लर रात्री दीडपर्यंत सुरू

Hukka
Hukka

मुंबई - राज्यामध्ये हुक्‍का पार्लरना परवानगी नसल्याचे राज्य सरकार सांगत असले तरी, राज्य सरकारच्या कामगार विभागाने काढलेल्या एका अधिसूचनेनुसार हुक्‍का पार्लरना राज्यात रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गृह विभागात खळबळ उडाली आहे. ही परवानगी कोणत्या आधारे दिली, याची विचारणा गृह विभागाने केली आहे.

कमला मिलमधील "मोजोस बिस्ट्रो' आणि "वन अबव्ह' या पबना हुक्‍का पार्लरमुळे आग लागल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या हुक्‍का पार्लरवर बंदी घालण्यासाठी कायदाही करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्याच्या कामगार विभागाने 19 डिसेंबर 2017 रोजी महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 बाबत अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये बियर बार, परमिट रूमबरोबर हुक्‍का पार्लरना रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार हुक्‍का पार्लर सुरू असल्याचे सांगण्यास महापालिकेने सुरवात केली आहे. कमला मिलमधील आग हुक्‍क्‍यामुळे लागल्याचा अहवाल आल्यानंतर लगेचच मुंबई महापालिकेने या अधिसूचनेचा आधार घेऊन त्याच्या आड लपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याविषयी गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कमला मिलमधील आगप्रकरणी दोषी असणारे या अधिसूचनेचा तांत्रिकदृष्ट्या बचाव करण्यासाठी वापर करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मुंबई महापालिकेने तर तो प्रयत्न सुरूच केला असून, दोषीदेखील या अधिसूचनेचा वापर करतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्‍त केली.

दरम्यान, हुक्‍का पार्लरना कोणत्याही प्रकारे कायदेशीर परवानगी नसताना हुक्‍का पार्लर किती वाजेपर्यंत सुरू राहू शकतात, याविषयी अधिसूचना काढण्यासाठी कशाचा आधार घेतला होता, असा प्रश्‍न गृह विभागाने कामगार विभागाला पत्र लिहून केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com