दहा लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे उद्दिष्ट - सुभाष देसाई

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मुंबई - राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या "मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स 2018' या जागतिक गुंतवणूक परिषदेत दहा लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले असून, सर्वांनी सहभाग नोंदवून यशस्वी करावे,'' असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी केले. रविवारी (ता. 18) मॅग्नेटिक महाराष्ट्र -कन्व्हर्जन्स 2018 या परिषदेचे उद्‌घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
या परिषदेची माहिती आज उद्योगमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल, महाराष्ट्र औद्योगिक महामंडाळाचे मुख्य कार्यकारी संचालक संजय सेठी उपस्थित होते. देसाई म्हणाले, की जागतिक स्तरावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची परिषद आयोजित करण्यात येत आहे. यापूर्वी "मेक इन इंडिया' या परिषदेचे यजमानपद राज्याने स्वीकारले होते. 2016 मध्ये आयोजित या परिषदेत आठ लाख कोटी रुपयांचे सामजस्य करार करण्यात आले होते, त्यापैकी सुमारे 61 टक्के करारांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतून दहा लाख कोटी रुपयांच्या उद्योगांच्या आश्वासनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर सुमारे साडेचारे हजार सांमजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याचे नियोजित आहे. यातून 35 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

महा उद्योगरत्न पुरस्कार रजनी
राज्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारतर्फे उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स 2018 या परिषदेत दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता. 19) एका विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. माहिती तंत्रज्ञान, निर्यात यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील 47 मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासोबतच राज्यातल्या नवोदित व तरुण व्यावसायिकांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने या आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्टअप अंडर 30 या स्पर्धेच्या विजेत्यांना "मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स 2018 स्टार्टअप ऍवार्डस अंडर 30' हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

परिषदेची वैशिष्ट्ये
- दहा लाख कोटी गुंतवणुकीचे उद्दिष्ट
- साडेचार हजार सामंजस्य करार होणार
- 35 लाख रोजगारनिर्मितीच्या संधी
- भारतातील औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राचा गेट वे तयार
- भरघोस गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती
- नव्या युगातील उद्योजकांना प्रोत्साहन
- प्रगतीचा प्रादेशिक समतोल

Web Title: mumbai news maharashtra news investment subhash desai