काळ्या यादीतील विझक्राफ्टवर 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'ची जबाबदारी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मुंबई - दोन वर्षांपूर्वी गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मंचाला लागलेल्या आगप्रकरणी काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या "विझक्राफ्ट' या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयाडीसी) मेहरनजर दाखवली आहे. रविवारी (ता. 18) मुंबईत होणाऱ्या "मॅग्नेटिक महाराष्ट्र' या उद्योजकांच्या मेळ्याच्या आयोजनाची जबाबदारी "विझक्राफ्ट'वर देण्याचे घाटत आहे. विशेष म्हणजे उद्योग विभागाला अंधारात ठेवून एमआयडीसीने विझक्राफ्टला पुन्हा पायघड्या घातल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दोन वर्षांपूर्वी मुंबईत "मेक इन इंडिया'च्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंचाला आग लागली. आगीच्या घटनेची गंभीर दखल घेत फडणवीस यांनी चौकशीचा आदेश दिला होता.
महापालिकेच्या अग्निशामक दलाने आगीच्या दुर्घटनेची चौकशी करून आयोजक विझक्राफ्ट कंपनीवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला होता. अग्निशामक दलाच्या अहवालाच्या आधारे मुंबई पोलिसांनी विझक्राफ्टवर "एफआयाआर' दाखल केले. त्यानंतर राज्य सरकारने विझक्राफ्टला काळ्या यादीत टाकले. अशा कंपनीला एमआयडीसीने पुन्हा काम देण्याचे ठरविल्याने उद्योग विभागात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे एमआयडीसीने या निर्णयाची माहिती उद्योगमंत्री किंवा खात्याच्या सचिवांना अद्याप दिलेली नाही. यासंदर्भात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

Web Title: mumbai news maharashtra news magnetic maharashtra event wizcraft