राज्यातील 496 कैदी नैराश्‍यात

मंगेश सौंदाळकर
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

मुंबई - कैद्यांच्या आत्महत्येच्या घटना रोखण्याकरिता तुरुंग प्रशासनाने गेल्या सप्टेंबरपासून राज्यभरात "ऑपरेशन ट्रॅकिंग' हा उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेनुसार केलेल्या पाहणीत 496 कैदी नैराश्‍यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 20 कैदी हे आत्महत्येचे पाऊल उचलू शकतात, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन दर तीन महिन्यांनी ऑपरेशन ट्रॅकिंग मोहीम हाती घेण्याच्या सूचना सर्व तुरुंगांना करण्यात आल्या आहेत.

राज्यात गृह विभागाच्या अंतर्गत 9 मध्यवर्ती, 31 जिल्हा आणि 13 खुले तुरुंग आहेत. अनेक कैद्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्याकरिता येत नाहीत, त्यामुळे ते नैराश्‍याने ग्रासले जातात. विशेषतः बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात लवकर जामीन किंवा पॅरोल मिळत नसल्याने कैदी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. नैराश्‍यातून, अनेक वेळा किरकोळ वादातून कैद्यांमध्ये हाणामारीही होते. त्याची दखल घेऊन तुरुंग प्रशासनाने "ऑपरेशन ट्रॅकिंग' हा उपक्रम सप्टेंबरमध्ये सुरू केला. ऑपरेशन ट्रॅकिंगअंतर्गत आत्महत्या करण्याची शक्‍यता असलेल्या कैद्यांची यादी तयार करण्यात येते. या मोहिमेनुसार चार महिन्यांत 496 कैदी नैराश्‍यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात काही हिंसक, हाणामाऱ्या करणारे असून, 20 कैदी हे आत्महत्येचा प्रयत्न करू शकतात, असे पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तुरुंग प्रशासन नजर ठेवून आहे. नैराश्‍याने ग्रस्त असलेल्या कैद्यांचे डॉक्‍टरांकडून वेळोवेळी समुपदेशनही करण्यात येते, असे तुरुंग प्रशासनाने सांगितले.

कैद्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे याकरिता तुरुंगात दर तीन महिन्यांनी ऑपरेशन ट्रॅकिंग सुरू ठेवण्याच्या सूचना सर्व तुरुंग प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. हा आढावा घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार असल्याचे गृह विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

12 महिन्यांत 121 आत्महत्या
2016-2017 या काळात राज्यात 121 कैद्यांनी आत्महत्या केली. यापैकी तुरुंगात 23; तर पॅरोल किंवा अन्य कारणांमुळे तुरुंगाबाहेर 93 जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. अन्य ठिकाणी पाच कैद्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. नाशिक रोड तुरुंगात सात, तळोजा- चार, पुणे- दोन, कोल्हापूर- दोन, ठाणे- एक आणि औरंगाबादमध्ये दोन कैद्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

Web Title: mumbai news maharashtra news prisoner depression