राज्यात लवकरच राखीव बटालियन तैनात!

सिद्धेश्‍वर डुकरे
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मुंबई - माहिती व तंत्रज्ञान युगात सोशल मीडियामुळे अनेक प्रकारची आव्हाने निर्माण झाली आहेत. सोशल मीडियावरून काही क्षणात व्हायरल होणाऱ्या करोडो संदेशांमुळे सामाजिक शांतता आणि संतुलन बिघडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न अकस्मात उदभवू शकतो. अशावेळी परिस्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी राज्यात लवकरच "भारत राखीव बटालियनच्या' दोन तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.

सोशल मीडियाला केंद्रस्थानी ठेवून खबरदारीचा उपाय म्हणून राज्याच्या गृहखात्याने काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयात दोन भारत राखीव बटालियन राज्याला मिळाव्यात अशी मागणी केली होती. भीमा-कोरेगाव घटनेनंतर लगेच केंद्राने दोन बटालियनला परवानगी दिली आहे. यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उदभवल्यास तो पूर्वरत करण्यासाठी याची मदत होणार आहे. ज्याप्रमाणे राज्य राखीव दल, शिघ्र कृती दल आपली जबाबदारी पार पाडते त्याप्रमाणे भारत राखीव बटालियन काम करणार आहे.

राज्यात सध्या अशा प्रकारच्या तीन बटालियन आहेत. कोल्हापूर, गोंदिया आणि औरंगाबाद येथे त्यांचे स्थळ आहे.

Web Title: mumbai news maharashtra news Reserved battalion posted in maharashtra