साहित्य संमेलनात पहिल्यांदाच "राईट्‌स कॉर्नर'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मुंबई - मराठीमध्ये उत्तमोत्तम साहित्याची निर्मिती होत असते; मात्र हे साहित्य अनुवादित न झाल्याने त्याची श्रेष्ठता ही मराठीजनांपुरतीच मर्यादित राहते; मात्र अनुवादाचा पूल बांधत साहित्य अन्य भाषांमध्ये भाषांतरित व्हावे, यासाठी यंदाच्या साहित्य संमेलनामध्ये प्रयत्न करण्यात येणार आहेत. पुस्तके भाषांतरित व्हावीत यासाठी मराठी आणि अमराठी प्रकाशकांसाठी स्वतंत्र "राईट्‌स कॉर्नर' हे दालन उभारण्यात येणार आहे. मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे आणि सहयोगी या संस्थेच्या संकल्पनेतून हे "राईट्‌स कॉर्नर' उभारण्यात येणार आहे.

मराठीतील दर्जेदार पुस्तके, दर्जेदार लेखक यांच्याबद्दल वाचून अमराठी वाचकही पुस्तक वाचण्यासाठी उत्सुक असतात; मात्र त्यांची मागणी ना मराठी प्रकाशकांपर्यंत पोहोचत होती, ना अमराठी प्रकाशकांपर्यंत. त्यामुळे या दोघांमधला दुवा बनण्याचा प्रयत्न यंदाच्या बडोदा येथे होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये होणार आहे.

16 ते 19 फेब्रुवारीदरम्यान संमेलन होणार असून यामध्ये दालन असणार आहे. यामध्ये मराठी प्रकाशकांना आपली पुस्तके इतर भाषांमध्ये भाषांतरित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रकाशक-लेखकांनी आपल्या पुस्तकांची मांडणी, त्याचे सूत्र इथे सादर करायचे आहे. यामध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, चर्चासत्र, अभिवाचन अशा विविध पद्धतीने पुस्तकांचे सादरीकरण खुले करण्यात आले आहे. यामध्ये मराठी प्रकाशकांबरोबरच गुजराती, हिंदी आणि इंग्रजी प्रकाशक प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. आतापर्यंत 40 हून अधिक मराठी, 15 हून अधिक गुजराती; तर 10 हून अधिक हिंदी व इंग्रजी प्रकाशकांनी नोंदणी केली आहे.

"राईट्‌स कॉर्नर'मध्ये पुस्तकांची माहिती घेऊन थेट राईट्‌स विकण्याबद्दल चर्चा करण्यात येणार असून केवळ भाषांतरावर चर्चा करण्याऐवजी थेट कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे भाषांतराच्या नव्या प्रवाहाला निश्‍चितच चालना मिळेल आणि मराठी साहित्याचे वैभव अन्य भाषकांपर्यंत यानिमित्ताने पोहोचेल.
- योगेश नंदुरकर, समन्वयक, सहयोगी संस्था

Web Title: mumbai news maharashtra news sahitya sammelan rights corner