आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळी?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

मुंबई - सरकारकडे दाद मागण्यासाठी येणाऱ्यांना मंत्रालयात आत्महत्या करणे किंवा तसा प्रयत्न करण्यापासून रोखायचे कसे, असा प्रश्‍न गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे. मंत्रालयाच्या नवीन इमारतीचा मध्यवर्ती भाग पूर्णपणे मोकळा असल्याने तिच्या पहिल्या मजल्यावर संरक्षक जाळी लावण्याच्या प्रस्तावावर शुक्रवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली.

मुंबई - सरकारकडे दाद मागण्यासाठी येणाऱ्यांना मंत्रालयात आत्महत्या करणे किंवा तसा प्रयत्न करण्यापासून रोखायचे कसे, असा प्रश्‍न गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे. मंत्रालयाच्या नवीन इमारतीचा मध्यवर्ती भाग पूर्णपणे मोकळा असल्याने तिच्या पहिल्या मजल्यावर संरक्षक जाळी लावण्याच्या प्रस्तावावर शुक्रवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली.

मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून गुरुवारी (ता. 8) हर्षल रावते या तरुणाने आत्महत्या केली. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. मंत्रालयाची सुरक्षा आणि आत्महत्यांचे सत्र रोखण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. नागरिकांनी मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून किंवा विष घेऊन आत्महत्या करण्याच्या घटना हे सरकारचेच नव्हे; प्रशासनाचेही अपयश आहे. अशा घटनांमुळे सरकारची प्रतिमा डागाळत असल्याने त्यावर कसे नियंत्रण आणता येईल, याविषयी या बैठकीत चर्चा झाली.

मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात इमारतीच्या पहिल्या मजल्याला समांतर संरक्षक जाळी बसविण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली; मात्र संरक्षक जाळी बसविल्याने सर्व प्रश्‍न सुटणार नसल्याचेही मत व्यक्‍त करण्यात आले.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला 2012 मध्ये लागलेल्या आगीनंतर मंत्रालयातील प्रवेशासाठी बारकोड पासची व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव होता. ज्या विभागात काम आहे तेथेच नागरिकांना प्रवेश देण्याची सूचना त्या वेळी करण्यात आली. प्रत्येक विभागाबाहेर बारकोड स्कॅनरद्वारे मंत्रालयातील प्रवेश नियंत्रित करण्याचा हा प्रस्ताव पुढे बारगळला. मंत्रालयात आत्महत्या करण्याच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा त्यावर चर्चा सुरू आहे; मात्र सरकारी कार्यालयात नागरिकांना दिलेल्या वेळेत त्यांना प्रवेश नाकारता येत नाही. शिवाय मंत्रालयात एकाच टेबलवर नागरिकांचे काम होईल, याची खात्री देता येत नाही. त्यांना एकाच कामासाठी विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे जावे लागण्याची शक्‍यता असते. त्यामुळे नागरिकांना बारकोड आणि ठराविक प्रवेशाची मर्यादा घालता येणार नसल्याचे मतही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

विशेष बंदोबस्त
हर्षल रावते याने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नवीन इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर चारही दिशेला पोलिस तैनात होते.

Web Title: mumbai news maharashtra news suicide mantralaya security nest