अर्थसंकल्पी अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून 28 मार्चपर्यंत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प नऊ मार्चला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून 28 मार्चपर्यंत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प नऊ मार्चला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक विधान भवनात झाली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी या वेळी कामकाजासंबंधी माहिती दिली.

अर्थसंकल्पी अधिवेशन एकूण 35 दिवसांचे असून 22 दिवस कामकाज चालणार आहे. राज्यपालांचे अभिभाषण 26 फेब्रुवारीला सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल; तर अर्थसंकल्प नऊ मार्चला दुपारी दोन वाजता सादर करण्यात येईल. विधानसभेत एक विधेयक; तर विधान परिषदेत चार विधेयके प्रलंबित आहेत. याशिवाय चार अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहेत; तसेच चार प्रस्तावित अध्यादेश आणि सहा प्रस्तावित विधेयकेही मांडण्यात येतील.

शिक्षणमंत्री विनोद तावडे, संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे, विधान परिषद सदस्य सुनील तटकरे, हेमंत टकले, अनिल परब, शरद रणपिसे, विजय ऊर्फ भाई गिरकर, डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा सदस्य गणपतराव देशमुख, अजित पवार, जयंत पाटील, राज पुरोहित हेही बैठकीला उपस्थित होते.

मराठी भाषा गौरवदिन
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारीला राज्यात "मराठी भाषा गौरवदिन' म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्‍वभूमीवर विधिमंडळात मराठी भाषा गौरवदिन साजरा केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यानिमित्त सुरेश भट यांनी लिहिलेली "मायबोली' ही कविता अधिवेशनाच्या सुरवातीला सादर केली जाईल. तसेच मराठी भाषा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारार्थींना विधिमंडळाच्या गॅलरीत बसवून त्यांचे अभिनंदन करण्यात येईल.

Web Title: mumbai news maharashtra news vidhimandal budget session