विधिमंडळावर धडकणार एक लाख बेरोजगारांचा मोर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

बेरोजगारी व सरकारी नोकरभरती बंदीने सामान्य युवकांमधे सरकार विरोधी कमालीचा संताप आहे. या युवकांचे हक्क व अधिकार यासाठीचा हा संघर्ष आहे. अहंकारी सरकारला युवकांचे हे ऐक्‍य व शक्तीसमोर नमावेच लागेल.
- संग्राम कोते पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस

मुंबई - शेतकरी व कर्जमाफीवरून आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक आघाडीने आता राज्यभरात बेरोजगारी व सरकारी नोकरबंदीच्या विरोधात "आक्रोश' आंदोलन छेडले आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारच्या युवकविरोधी धोरणांचा निषेध करत एक लाख बेरोजगार युवकांचा मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिला आहे.

युवक राष्ट्रवादीच्या वतीने आतापर्यंत शहरी युवा संघठनावर भर देत नागरी समस्यांसाठी 15 महापालिकांवर मोर्चे काढले आहेत, तर आठ जिल्ह्यांत बेरोजगारीचा संताप व्यक्त करत मोर्चे काढले. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, धुळे, नाशिक या जिल्ह्यात युवकांच्या या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. यामुळे आता राज्यातल्या 30 जिल्ह्यांत बेरोजगारीच्या प्रश्नावरून युवकांमधला आक्रोशाकडे लक्ष वेधण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

राज्यभरात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळणाऱ्या सरकारी जागा घटल्या असल्याने बेरोजगार युवकांचे मोर्चे निघत आहेत. त्याच दरम्यान राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने बेरोजगार युवकांचा ज्वलंत प्रश्नावर सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या 26 फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. ते 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. याच कालावधीत मुंबईत विधिमंडळावर राज्यभरातील एक लाख बेरोजगार युवकांचा मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी युवकने दिलेला असून, त्यासाठीची तयारी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी सुरू केली आहे.

Web Title: mumbai news maharashtra news vidhimandal unemployed rally