मंत्रालयात तरुणाची आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मंत्रालयात आज आणखी एक बळी गेला. हर्षल रावतेची ही आत्महत्या आहे, की अपघात हे चौकशीत सिद्ध होईल; परंतु मंत्रालय हे आता "सुसाइड पॉइंट' झाले आहे, ही बाब महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही. नागरिकांना मंत्रालयात येऊन जीव देण्याची वेळ का येते? याचे सरकारने आत्मपरीक्षण केले पाहिजे.
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्ष नेते, विधानसभा

मुंबई - जन्मठेपेची शिक्षा कमी करून घेण्यासाठी मंत्रालयात आलेल्या हर्षल रावते (वय 44) या चेंबूरच्या तरुणाने मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हर्षलला अत्यावस्थेत सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मंत्रालयामध्ये या महिनाभरात दोन जणांनी आत्महत्या केली आहे, तर एक आत्मदहनाचा प्रयत्न झाला आहे.

मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून हर्षलने त्रिमूर्ती प्रांगणात सायंकाळी सहा वाजता उडी मारून आत्महत्या केली. 2003 मध्ये मेहुणीच्या खुनाच्या गुन्ह्याप्रकरणी तो पैठणच्या खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. अतिरिक्‍त पोलिस महासंचालक (तुरुंग) बी. के. उपाध्याय यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, की बारा वर्षे शिक्षा भोगून झाल्यानंतर गेल्याच महिन्यात दहा जानेवारीला हर्षल एक महिन्यासाठी पॅरोलवर बाहेर होता. आज त्याचा पॅरोलचा शेवटचा दिवस होता आणि त्याला पैठण येथील न्यायालयात उपस्थित राहावयाचे होते.
हर्षलच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असल्याचे समजते; मात्र पोलिसांकडून यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या चिठ्ठीत जन्मठेपेची उर्वरित शिक्षा कमी करून घेण्यासाठी तो मंत्रालयात आला होता; मात्र त्याची संबंधित अधिकाऱ्यांची भेट न झाल्याने निराश होऊन आत्महत्या करत असल्याचे लिहिल्याचे समजते.

ही घटना घडताच लगेचच वीस मिनिटांच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील मंत्रालयात पोचले.

Web Title: mumbai news maharashtra news youth suicide in mantralaya