हिंदुत्ववादी शिवसेना आमच्याबरोबरच - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 मार्च 2018

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल झाला असला, तरी राज्य सरकारला कोणताही धोका नसल्याचे आणि परिस्थिती निर्माण झाल्यास शिवसेना भाजपसमवेत असेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र प्रत्येक पक्षाचा वेगळा कार्यक्रम असतो, शिवसेना काय करणार ते सोमवारीच कळेल, असे सांगून सावध पवित्रा घेतला आहे.

लोकसभेत दाखल होणाऱ्या अविश्‍वास ठरावाकडे आज संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना भाजपशी संबंध ताणले गेलेली शिवसेना नेमकी काय करणार, अशी विचारणा सुरू झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही खासदारांशी याविषयी विचारविनिमय केला असून, शिवसेना लवकरच भूमिका स्पष्ट करेल, असे सांगितले जात होते. शिवसेनेने किमान तटस्थ राहावे, असा प्रयत्न भाजपच्या गोटातून सुरू आहे, असे मानले जात असतानाच फडणवीस यांनी मात्र शिवसेना आमच्यासमवेत असल्याचे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना स्पष्ट केले. कायम विरोधी भूमिका घेणारी शिवसेना या विषयावर भाजपसमवेत कशी, या प्रश्‍नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या दोघांच्याही भूमिका राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी आहेत, त्यामुळे ते आमच्यासमवेत आहेत, असे स्पष्ट केले.

यानंतर केवळ काही मिनिटांनी झालेल्या पत्रपरिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी मात्र प्रत्येक पक्षाचा कार्यक्रम वेगळा असतो, त्यामुळे शिवसेनेची भूमिका सोमवारी स्पष्ट होईल, असे "नरो वा कुंजरोवा' विधान केले. आमची 25 वर्षांची युती असून, आम्ही आजवर केवळ एक निवडणूक वेगळे लढलो आहोत, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

अविश्‍वास प्रस्तावाबाबत शिवसेना विरोधी भूमिका घेणार नाही. आम्ही एक आहोत, आमच्यासंबंधांत कोणताही दुरावा नाही, त्यामुळे शिवसेनेने या ठरावाबाबत वेगळी भूमिका घेण्याचा प्रश्‍नच नाही.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: mumbai news maharashtra shivsena devendra fadnavis politics