धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वानुसार बेकायदा मंडपांवर कारवाई करा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

मुंबई - सण-उत्सव साजरे करण्यास मनाई नाही; मात्र कायद्याच्या चौकटीत राहून ते साजरे व्हायला हवेत. बेकायदा मंडपांवर कारवाई करताना धर्मनिरपेक्ष तत्त्वाचा अवलंब महापालिकांनी करावा, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावले. 

मुंबई - सण-उत्सव साजरे करण्यास मनाई नाही; मात्र कायद्याच्या चौकटीत राहून ते साजरे व्हायला हवेत. बेकायदा मंडपांवर कारवाई करताना धर्मनिरपेक्ष तत्त्वाचा अवलंब महापालिकांनी करावा, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावले. 

रस्त्यांवर खड्डे खोदून उभारलेल्या अवैध मंडपांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर आज न्या. अभय ओक आणि न्या. ए. के. मेनन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ठाणे महापालिकेच्या वतीने या वेळी कारवाईसंदर्भात माहिती देण्यात आली. पालिकेने कारवाई केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. अनेकदा उत्सव साजरा करणेही थांबवले जाते, असे ऍड. राम आपटे यांनी सांगितले; मात्र न्यायालयाने उत्सव साजरे करण्यावर कधीही बंदी घातलेली नाही, तो आमचा उद्देशही नाही. फक्त ते साजरे करताना कायदा-सुव्यवस्था राखावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. महापालिकांनी मंडपांना परवानगी देताना आणि कारवाई करताना धर्मनिरपेक्ष तत्त्वाचा अवलंब करावा आणि जेथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो, तेथे पोलिसांचे सहकार्य घ्यावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली. 

गणेशोत्सव-नवरात्रीमध्ये उभारण्यात आलेल्या बेकायदा मंडपांवर कारवाई करण्यात कसूर केल्याबद्दल न्यायालयाने मुंबईसह नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आदेश देऊनही मंडपांवर कारवाई का केली नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. याचिकेवर आता 30 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

Web Title: mumbai news mandap court