मंजुळाचा मृत्यू मारहाणीमुळे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

मुंबई - भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेटे हिचा मृत्यू डोक्‍यावर जबर मार बसल्यामुळे झाला, असे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र, तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेले नाहीत, असा जबाब पोलिस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी महिला आयोगाकडे दिला. 

मुंबई - भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेटे हिचा मृत्यू डोक्‍यावर जबर मार बसल्यामुळे झाला, असे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र, तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेले नाहीत, असा जबाब पोलिस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी महिला आयोगाकडे दिला. 

मंजुळाच्या मृत्यूबाबत मरिअम शेख या "पिटा' तील आरोपीसह बराक क्रमांक पाचमधील कैदी महिलेने नागपाडा पोलिस ठाण्यात एफआयआर दिला. या एफआयआरची प्रत "सकाळ'ला मिळाली. त्यात म्हटले आहे, की या बराकीत त्या दोघींसह आणखी 51 कैदी महिला असून तीन महिन्यांपूर्वी मंजुळा हिला येरवडा तुरुंगातून भायखळा तुरुंगात आणण्यात आले होते. मंजुळा व आपली चांगली मैत्री झाली होती. तिने 13 वर्षे तुरुंगात घालावले. तिचे तुरुंगातील वर्तन चांगले असल्याने तिला वॉर्डनच्या सहाय्यकाची जबाबदारी देत जेलरला मदत करण्याची जबाबदारी दिली होती. नेहमीप्रमाणे अंडी आणि पावाचे वाटप झाल्यानंतर दोन अंडी व पाच पाव कमी पडल्याने तुरुंग अधिकारी मनिषा पोखरकर यांनी याबाबत तिला खडसावले होते. त्या रागातूनच पोखरकर यांनी मंजुळाच्या गळ्याला तिचीच पिवळ्या रंगाची साडी गुंडाळून फरफटत बराकीत नेले आणि लाथाबुक्‍यांनी मारहाण करायला सुरुवात केली. तिचा आरडाओरडा पाहून तिला सोडवण्यासाठी बिंदू, वसीमा, आरती, शीतल, सुरेखा व इतर कैदी महिला धावल्या; मात्र, तिला सोडवले तर तुम्हालाही अशीच मारहाण करू, अशी धमकी पोखरकर यांनी दिली. त्यामुळे इतरांनी हस्तक्षेप केला नाही. 

या मारहाणीनंतर मंजुळा झोपली. सांयकाळी सातच्या सुमारास तिच्या विनंतीवरून मरिअम आणि रंजना यांनी तिला बाथरूमला नेले. मात्र, तिथे तोल गेल्याने मंजुळा पडली. तिथेच तिला शौचाला झाले, तिची शुद्धही हरपली होती. तिला स्वच्छ केल्यानंतर कविता, पूजा, आरती यांनाही मंजुळासंदर्भात कल्पना दिली. पण; त्यांनी दुर्लक्ष केले. बऱ्याच प्रयत्नांनंतरही मंजुळा शुद्धीवर न आल्याने तुरुंगातील डॉक्‍टरांना बोलावण्यात आले. त्यांच्या सल्ल्यानुसार अमृता, मॅथ्यू, वर्षा आणि गीता यांनी तिला रुग्णालयात नेले. नंतर तिला तुरुंग अधिकारी बावीसकर व इतर कर्मचारी जे. जे. रुग्णालयात घेऊन गेले. तिथेच तिचा मृत्यू झाल्याचे समजले, असेही एफआयआरमध्ये म्हटले आहे. 

मंजुळाच्या मृत्यूस जबाबदारांची नावे... 
तुरुंग अधिकारी पोखरकर, बिंदू वायकर, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे यांनी केलेल्या जबर मारहाणीमुळे तसेच अवघड जागेत काठी खुपल्याने मंजुळाचा मृत्यू झाला, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. 

Web Title: mumbai news Manjula Shetty case