संडे हो या मंडे, कसे खावे महागडे अंडे?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

मार्गशीर्ष महिन्याचा उपवासकाळ आणि दक्षिण भारतात अयप्पा पर्व सुरू होणार असल्याने अंड्याची मागणी कमी होईल. ती कमी झाली की दर उतरेल.
- एम. बी. देसाई, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रीय अंडी समन्वयक समिती

मुंबई : भाजीपाला आणि कांद्याने डोळ्यात पाणी आणले असताना अंड्यांचा प्रतिडझनाचा दर 80 ते 84 रुपयांवर पोहोचला आहे. वाढत्या महागाईने गृहिणींच्या किचनचे बजेट पार कोलमडले आहे.

काही महिन्यांपासून भाज्या आवाक्‍याबाहेर आहेत. टोमॅटोने 50 रुपयांवर उडी घेतली आहे. कांदे 40 ते 50 रुपयांच्या दरम्यान आहेत. भेंडी, मटार कोबी, घेवडा, दुधी, शिराळे आदी भाज्या काही दिवसांपासून 70 ते 80 च्या घरात ठाण मांडून आहेत. आता भाज्यांच्या रांगेत अंडीही जाऊन बसली आहेत. महागाईने त्रासलेल्या गृहिणींना अंडी महागल्याने बजेटची जुळवाजुळव करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुंबईतील किरकोळ बाजारात अंड्याचा प्रतिडझन दर 80 ते 84 रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ विक्रेते एका अंड्यासाठी सात रुपये घेत आहेत. अंडी महागल्याने त्याची झळ ऑम्लेट पाव आणि भुर्जी-पाव विक्रेत्यांनाही बसली आहे.

मार्गशीर्ष महिन्याचा उपवासकाळ आणि दक्षिण भारतात अयप्पा पर्व सुरू होणार असल्याने अंड्याची मागणी कमी होईल. ती कमी झाली की दर उतरेल.
- एम. बी. देसाई, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रीय अंडी समन्वयक समिती

यंदा उत्तर भारतात थंडीचा हंगाम लवकर सुरू झाल्याने तेथून अंड्याची मागणी वाढली आहे. नोटाबंदीनंतर जवळपास सहा महिने अंड्यांना भाव मिळत नव्हता. त्या काळात कोंबड्यांना चांगला भाव मिळत होता. त्यामुळे अनेक पोल्ट्रीफार्म मालकांनी कोंबड्यांची विक्री केली. परिणामी अंड्यांच्या उत्पादनात घट झाल्याची माहिती राष्ट्रीय अंडी समन्वय समितीचे मुंबई विभागीय अध्यक्ष एम. बी. देसाई यांनी दिली. मुंबईत दररोज सरासरी एक कोटी 80 लाख अंडी लागतात. ही गरज भागवण्यासाठी पुणे, हैदराबाद, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर अंड्यांची आवक होते. मात्र गेल्या 15 दिवसांपासून शहरातील अंड्यांची आवक 80 लाखांवर घसरली आहे. त्यामुळे त्यांचे दर वाढले, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mumbai News Marathi News Eggs prices higher in Mumbai