वैद्यकीय प्रवेशांसाठी पहिली यादी जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई  -राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशांसाठी पहिली सर्वसाधारण यादी मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जाहीर करण्यात आली. या वेळी "डोमिसाइल' प्रमाणपत्रांचा गोंधळ झाला नसल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले. 

मुंबई  -राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशांसाठी पहिली सर्वसाधारण यादी मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जाहीर करण्यात आली. या वेळी "डोमिसाइल' प्रमाणपत्रांचा गोंधळ झाला नसल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले. 

राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळावा, यासाठी काही विद्यार्थ्यांनी रहिवास दाखल्याचा गैरवापर केला, अशी तक्रार पालकांनी केली होती. सोमवारी मंत्रालयावर या संतप्त पालकांनी मोर्चाही नेला. त्यानंतर "जीटी' रुग्णालयात झालेल्या बैठकीला "डीएमईआर'चे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे उपस्थित होते. त्या वेळी परराज्यांतून दहावी आणि राज्यातून बारावीची परीक्षा देऊन या वैद्यकीय प्रवेशात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी पालकांनी केली. 

या यादीच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, असे आश्‍वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. दोन राज्यांच्या प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांची नावे वगळण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली; परंतु हे आश्‍वासन तोंडी असल्याने पालक नाराज झाले होते. तब्बल 400 विद्यार्थ्यांची नावे वगळली गेली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी वैद्यकीय प्रवेशाची सर्वसाधारण यादी जाहीर झाली. 

सर्वसाधारण यादीपूर्वीच या यादीत रहिवास दाखल्याबाबत गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्टीकरण डॉ. शिनगारे यांनी दिले. या यादीतून 750 नावे वगळली गेली. आवश्‍यक कागदपत्रांचा अभाव व इतर कारणांमुळे ही नावे वगळली गेल्याची माहिती डॉ. शिनगारे यांनी दिली. या यादीत 49 हजार 756 विद्यार्थी होते. दरम्यान, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बुधवारी रात्री यादी जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: mumbai news medical admission