पडद्यामागचे मिलिंद नार्वेकर आता थेट पडद्यावर

टीम ई सकाळ
मंगळवार, 23 जानेवारी 2018

मुंबईः कायम पडद्यामागे राहून सूत्रे हलविणाऱया मिलिंद नार्वेकर यांच्या हाती सचिवपदाची थेट जबाबदारी देऊन शिवसेनेच्या मुख्य नेतृत्वाने आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष किती आक्रमक राहणार आहे, याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

मुंबईः कायम पडद्यामागे राहून सूत्रे हलविणाऱया मिलिंद नार्वेकर यांच्या हाती सचिवपदाची थेट जबाबदारी देऊन शिवसेनेच्या मुख्य नेतृत्वाने आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष किती आक्रमक राहणार आहे, याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मित्र, व्यक्तिगत सचिव ते पक्षाचे सचिव हा नार्वेकर यांचा 23 वर्षांचा प्रवास आहे. हा प्रवास साधा-सरळ आणि 'शाखा' स्टाईलच्या शिवसेना कार्यकर्त्यासारखा अजिबात नाही. त्यात अनंत अडचणी होत्या आणि आहेत. कित्येक समज-गैरसमज आहेत. नारायण राणेंसारखे मातब्बर नेते पक्षातून बाहेर पडताना एकाबाजुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंविषयी कृतज्ञतेने बोलत होते आणि दुसऱया बाजूला नार्वेकरांचे नाव घेऊन, उद्धव ठाकरेंचा त्यांच्यावर असलेल्या विश्वासाचा उल्लेख करून 'पक्षात शेवटी उद्धव आणि नार्वेकरच राहतील,' असे प्रचंड आत्मविश्वासाने सांगत होते. ही घटना फार काही जुनी नाही. अवघी 13 वर्षे होत आहेत.

राणेंपाठोपाठ राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. 2006 मध्ये सेनेतून बाहेर पडताना राज यांचे शब्द होते, विठ्ठलाला बडव्यांनी घेरला आहे. राज यांचा विठ्ठल बाळासाहेब. बडव्यांमध्ये अग्रेसर नाव 'नार्वेकर' होते. अगदी अलिकडे, म्हणजे 2013 मध्ये माजी खासदार मोहन रावले यांनीही उद्धव ठाकरेंना गोंजारत नार्वेकरांवरच तोंडसूख घेतले. 'माझी आणि उद्धव ठाकरे यांची चार वर्षे भेट झाली नाही आणि त्याला कारण नार्वेकर,' असे रावले यांचे विधान होते अवघ्या पाच वर्षांपूर्वी.

तरीही नार्वेकर उद्धव आणि पक्ष यांच्या अगदी मध्यभागी उभे राहिले. शिवसेनेच्या 'राडा' स्टाईलचा मोजका नेमका आणि आवश्यक तेवढाच वापर ही युक्ती उद्धव यांच्याकडे सूत्रे आल्यानंतर हळू हळू अंमलात आली. त्यासाठी प्रत्यक्ष उद्धव यांना कोणा कार्यकर्त्याला फोन करून समजावून सांगावे लागले नाही. ते काम उद्धव यांच्यावतीने नार्वेकर यांनी निभावले. बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना संपणार, हा राजकीय आडाखा पूर्ण फसला. त्यामागे उद्धव यांचे काळानुरूप बदलत जाणारे नेतृत्व जितके कारणीभूत ठरले, तितकीच नेतृत्वाची नेमकी अपेक्षा काय, हे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविणारे नार्वेकरही.

शिवसेनेवर गेल्या पंधरा वर्षांत धोरणांवरून वारंवार टिका झाली आणि नार्वेकरांवरूनही. नार्वेकरांवरून होणारी टिका पक्षांतर्गत नाराजांकडून कधी उघड-कधी छुपी झाली. मात्र, पक्षांतर्गत या व्यक्तीचं महत्व सेनेतील नेत्यांना आणि विरोधकांनाही माहिती आहे. पक्षासाठी काय हवे-काय नको आणि पक्ष नेतृत्वासाठी काय योग्य-काय अयोग्य या दोन्हींमध्ये समन्वय साधण्याचे काम नार्वेकरांनी केले. पक्ष वाढीसाठी 'ग्राऊंडवर अडचणी आणणारे कोण' याचाही प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा चेहरा पुढे आणण्यासाठी उद्धव उघडपणे प्रयत्न करीत आहेत. अशावेळी सर्वात विश्वासू सहकारी आदित्यसोबत देण्याची वेळ उद्धव यांनी नार्वेकर यांच्या नियुक्तीने साधली आहे.

नार्वेकर माध्यमांना टाळतात. कोणतीही प्रतिक्रिया सहज देत नाहीत. प्रतिक्रियांमधून पक्षाचा, व्यक्तिचा अंदाज येऊ शकतो. तो अंदाज देणं नार्वेकरांनी आतापर्यंत टाळलं आहे. परिणामी, ते समोरच्याला अधिकाधिक बेसावध ठेवू शकतात आणि वेळ येताच पूर्ण ताकदीने विरोधकांना शह देऊ शकतात.

नार्वेकर एकदा म्हणाले होते, 'मी पक्षाच्या शाखाप्रमुख पदासाठी उद्धव यांना भेटायला आलो होतो आणि मला त्यांचा व्यक्तिगत सचिव म्हणून काम करायची संधी मिळाली.' या व्यक्तिगत सचिवाला पक्षाचा सचिव म्हणून बसवून उद्धव यांनी एकाचवेळी भाजप, पक्षांतर्गत नाराज आणि अन्य विरोधकांना जबरदस्त शह दिला आहे, हे निश्चित. 

Web Title: mumbai news milind narvekar shivsena and maharashtra politics